esakal | उमरग्यात विदेशी दारूच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक, नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

crime

उमरगा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील मनिषा बारमध्ये झालेल्या विदेशी दारूच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडुन गुरूवारी (ता.२०) विदेश दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

उमरग्यात विदेशी दारूच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक, नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील मनिषा बारमध्ये झालेल्या विदेशी दारूच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडुन गुरूवारी (ता.२०) विदेश दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत ८८ हजार ३२० रुपये आहे.राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मनिषा बारमधून दोन ते चार ऑगस्ट दरम्यान विदेशी दारुची चोरी झाली.

या प्रकरणी पाच ऑगस्टला गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, कर्मचारी चंद्रकांत गायकवाड, बाबा कांबळे, सुभाष दिवे, अनिल भोसले यांनी तपास करून चोरी प्रकरणातील श्रीनिवास जनार्दन माने-पाटील (राहणार औटी प्लॉट, उमरगा), गणेश गोपाळ मडोळे (राहणार सानेगुरुजी नगर, उमरगा) यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चिंचोली (जहागीर) शिवारातील शेतातील कोट्यातुन ८८ हजार ३२० रुपये किंमतीचे विदेशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.मालुसरे हे करत आहेत.

वाचा : लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

तरुणाच्या खूनप्रकरणी सहाजणांवर गुन्हा
बुकनवाडी (ता. उस्मानाबाद) येथील सुरेश अरुण काळे (वय २०) या पारधी समाजातील तरुणाच्या खून प्रकरणात ढोकी पोलिस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महिलेच्या समोर लघुशंका केल्याच्या कारणावरून बुधवारी (ता. १९) बुकनवाडी शिवारात हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या प्रकरणी रुक्मिणी अरुण काळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, सुरेश याला बुकनवाडी शिवारातील गायरान शेतात संशयित आरोपींनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. शिवाय गळा आवळून खून केला आणि मृतदेह झाडाला लटकवला, असा आरोप त्यांनी केला.

त्या आधारे पोलिसांनी बालाजी छगन वाकुरे, पांडुरंग छगन वाकुरे, पोपट छगन वाकुरे, योगेश अरुण वाकुरे, समाधान हरीभाऊ वाकुरे, अंकुश इंद्रजित बुकन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आकेला आहे. या गुन्ह्याचा तपास कळंब येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील करीत आहेत. दरम्यान घटना घडल्यानंतर २४ तास उलटले तरी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. गुन्हा दाखल होत नसल्याने ग्रामीण रुग्णालयात तणाव वाढत गेला होता. जोपर्यंत संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास मृताच्या नातेवाइकांनी नकार दिल्याने गुरुवारी (ता. २०) सायंकाळी सहापर्यंत मृतदेह ग्रामीण रूग्णालयातील शवविच्छेदन कक्षातच होता, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.

(संपादन : गणेश पिटेकर)

loading image
go to top