गडदगड धरणात बुडून दोन भावांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

नागद - नागद (ता. कन्नड) येथील गडदगड मध्यम प्रकल्पात दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. सहा) सकाळी घडली.

नागद - नागद (ता. कन्नड) येथील गडदगड मध्यम प्रकल्पात दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. सहा) सकाळी घडली.

योगेश नाना पाटील, ठाकरे (वय 32), नीलेश नाना पाटील, ठाकरे (वय 27) हे दोघे भाऊ शनिवारी सकाळी शेतात जाऊन येतो, असे म्हणून घराबाहेर पडले. गडदगड धरणातील मोटार चालू करण्यासाठी ते गेले असता एका भावाचा पाय घसरून तो धरणात पडला. त्याला दुसरा भाऊ वाचविण्यासाठी गेला असता दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. नागद गावातून दोन्ही भावांची एकाच वेळी अंत्ययात्रा निघून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे दोन्ही बंधू सकाळी धरणावरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. धरणाच्या किनाऱ्यावर मोटारसायकल उभी करून कपडे, चप्पल काढून ते पाण्यात मोटारीकडे गेले. सकाळी साडेनऊला वीज येणार असल्याने मोटार, पाईप व्यवस्थित करून ठेवण्यासाठी ते गेले असावेत; परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. वडगाव जाधव येथील शेतकरी मोटार चालू करण्यासाठी आले असता त्यांना तिथे मोटारसायकल, कपडे व चपला दिसल्या. तपास करीत असताना मोटारीजवळील खड्ड्यात दोघे भाऊ एकमेकांना बिलगलेल्या अवस्थेत दिसले. नागद व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून पाण्यात शोध घेऊन त्यांना वर काढण्यात आले. जगदीश रामधन राजपूत, किरण साहेबराव पाटील, गोविंद रतनसिंग राजपूत या शेतकऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. दोघा भावांचे मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र, नागद येथे नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून दोघा भावांना चाळीसगाव (जि. जळगाव) येथे नेले. डॉक्‍टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नागद येथे आणण्यात आले. अंत्यविधीसाठी मोठा जनसागर उसळला होता.

महिन्यापूर्वीच झाला होता धाकट्या भावाचा विवाह
मृत दोघे भाऊ विवाहित होते. थोरल्या भावास एक वर्षाचा मुलगा आहे. लहान भावाचा एक महिन्यापूर्वी विवाह झाला होता. दोघे भाऊ सख्खे साडू असल्याने कुर्हे गावावरही शोककळा पसरली.

Web Title: two brother death by drown