दोन मुलांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

शहरातील नक्षत्रवाडी परिसरातील खदानीत तुंबलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (ता. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास समोर आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तुषार प्रकाश शिरसाट (वय १२), प्रदीप भगवान काजळे (वय नऊ, दोघेही रा. नक्षत्र पार्क) अशी मृतांची नावे आहेत.

औरंगाबाद - शहरातील नक्षत्रवाडी परिसरातील खदानीत तुंबलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (ता. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास समोर आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तुषार प्रकाश शिरसाट (वय १२), प्रदीप भगवान काजळे (वय नऊ, दोघेही रा. नक्षत्र पार्क) अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वलाताई पवार हायस्कूलमध्ये तुषार सहावीत; तर प्रदीप काजळे हा नूतन हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत होता. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास दोघेही खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी दोघेही नक्षत्रवाडीतील पंपहाऊसजवळील खदानीकडे गेले. खदानीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी दोघांनी अंगातील कपडे काठावर काढून ठेवले.

खदानीत उतरल्यानंतर दोघेही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. सायंकाळी उशिरापर्यंत दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे पालकांनी दोघांचा शोध घ्यायला सुरवात केली. तेव्हा खदानीच्या काठावर दोघांचे कपडे दिसून आले. त्यामुळे दोघेही बुडाल्याचा पालकांना संशय आला. अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांना बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना रात्री अकराच्या सुमारास घाटीत दाखल केले असता डॉक्‍टरांनी दोघांना मृत घोषित केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Child Death Drown