मोटारीत गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

घरातून गायब झालेल्या तीन मुलांबाबत वेगवेगळे तर्क लावण्यात येत होते. मात्र ही तीनही बालके खेळताना एका मोटारीत बसली अन्‌ दरवाजे आतून बंद झाले. परिणामी, गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम थांबवली.

बुलडाणा - घरातून गायब झालेल्या तीन मुलांबाबत वेगवेगळे तर्क लावण्यात येत होते. मात्र ही तीनही बालके खेळताना एका मोटारीत बसली अन्‌ दरवाजे आतून बंद झाले. परिणामी, गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम थांबवली.

गवळीपुरा भागात राहणारे शेख हनीफ शेख हिरा यांचे शेख साहिल शेख जमील (वय 5) आणि शेख अजीज शेख समीर (वय 3) हे नातू व सहर शेख हमीद (वय 4) ही नात सोमवारी (ता. 15) अंगणवाडी केंद्रात गेली होती. तेथे खिचडी खाऊन ही मुले बाहेर गेली; परंतु ते दुपारी एकपर्यंत घरी न आल्याने याबाबतची तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. तीनही बालकांचे अपहरण झाल्याची चर्चा सुरू झाली. नरबळीची शंकाही व्यक्त करण्यात आली. रात्री अडीचच्या दरम्यान टिपू सुलतान चौकासमोरील एका घरासमोर उभ्या असलेल्या मोटारीजवळ जाऊन शोध घेताना पोलिसांना संशय आला. त्यांनी मोटारीचे दरवाजे उघडले. या वेळी दोन्ही मुले अत्यवस्थ अवस्थेत; तर मुलगी सहर शुद्धीवर आढळली. यामध्ये शेख साहिल व शेख अजीज या दोघांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

या प्रकरणात घातपाताचा संशय नसल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two children die in a four wheeler