
Osmanabad Crime : खेळायला गेले अन् परतलेच नाही; खदाणीमध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू
Osmanabad Crime : खदाणीमधील पाण्यात बुडून दोन किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ७) समोर आली.
शहरातील हॉटेल शालीमारच्या पाठीमागे असलेल्या खदाणीच्या परिसरात सकाळी साडेदहाच्या सुमारास गल्लीतील काही मुले खेळण्यासाठी गेली होती. त्यात विराट विरेंद्र झेंडे (वय ११) हा खदाणीत पडला. त्याचा वाचविण्यासाठी प्रशिक बाळासाहेब खंडागळे (१६) हा गेला. मात्र खदाणीतील पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, याबात चौथीत असलेल्या एका मुलाने गल्लीत येऊन माहिती दिली. काहींनी शोध घेतला असताना खदाणीत काही दिसले नाही. अग्निशमन दलालाही मुले सापडली नव्हती. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने शोध सुरू केल्यावर दुपारी दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले.
चौथीत शिकणाऱ्या मुलाव्यतिरिक्त कुणीही हा प्रकार पाहिला नसल्याने नेमकी घटना कशी घडली याची माहिती समोर आलेली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळी सुटी लागल्याने मुले खेळायला बाहेर जातात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी सतर्क राहाण्याची गरज व्यक्त होत आहे.