कन्नडमध्ये दोन नगरसेवकांसह शंभर जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

कन्नड - कन्नड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांना शिवीगाळ करून, त्यांच्या अंगावर फावडे उगारण्यात आले. ही घटना सोमवारी (ता. 22) सकाळी साडेअकराच्या सुमारास नगरपालिका स्थायी समिती समितीच्या बैठकीत घडली. या प्रकरणी आघाडीच्या दोन नगरसेवकांसह शंभर जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर काही काळ शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

कन्नड नगरपालिका कार्यालयात सोमवारी सकाळी स्थायी समितीची बैठक सुरू झाली. दरम्यान, या बैठकीत साडेअकराच्या सुमारास आघाडीचे नगरसेवक अय्यास शहा यांनी शहरात साफसफाई होत नसल्याचा आक्षेप घेत नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर फावडे उगारले. त्यांच्या दालनाच्या काचा फोडल्या.

नगरसेवक संतोष तोताराम पवार, सईद मिस्त्री व इतर शंभर नागरिकांचा जमाव नगराध्यक्षांच्या दालनामध्ये आणून गोंधळ घातला. घाणीचा ट्रॅक्‍टर आणून नगरपालिकेच्या पायऱ्यांसमोर घाण टाकली. स्थायी समितीची सभा उधळून लावली. या वेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, शेख मजिद शेख बशीर, स्वच्छता निरीक्षक देवीदास पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक अय्यास शहा, संतोष पवार, सईद मिस्त्री यांच्यासह इतर शंभर जणांविरुद्ध कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरध्यक्षांची तक्रार घेण्यास पोलिस विलंब लावत होते. तेव्हा नगराध्यक्ष संतप्त झाल्या. त्यांनी पोलिस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंह यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार ए. जी. शिंदे करीत आहेत. दरम्यान, सईद मिस्त्री यांनीही नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, योगेश कोल्हे, राजू मोकासे, रवी राठोड, बंटी काशीनंद, किसनकाका कोल्हे यांच्या विरोधात शिवीगाळ, मारहाणप्रकरणी कन्नड शहर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार अशोक तुपे हे करीत आहेत.

Web Title: two corporator & 100 people on crime