गणेश बोरसेच्या विरोधात आणखी दोन गुन्ह्यांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

प्लॉट मिळवून देण्यासाठी अडीच; तर नोकरीसाठी घेतले दोन लाख

प्लॉट मिळवून देण्यासाठी अडीच; तर नोकरीसाठी घेतले दोन लाख
औरंगाबाद - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाचा वापर करून फसवणूक करणाऱ्या गणेश रावसाहेब बोरसे (वय 46, मूळ रा. करजगाव, जि. जालना, सध्या रा. औरंगाबाद) याच्या विरोधात शहरात आणखी दोन गुन्ह्यांची नोंद झाली. त्याने दानवे यांचे नाव वापरून विविध कामे करून देण्याच्या नावाखाली अनेकांना लाखो रुपयांना गंडवल्याचा आरोप आहे.

प्रमोद प्रभाकरराव वाकोडकर यांचे परभणी येथे व्यंकटेश मंगल कार्यालय व वाकोडकर मल्टी सर्व्हिसेस आहे. त्यांच्या फर्मची भविष्यनिर्वाह निधीसंदर्भात औरंगाबाद येथील कार्यालयात गत वर्षापासून सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी लवकर करून निकाल तुमच्या बाजूने देण्याचे आमिष दाखवून बोरसे याने एक लाख रुपये उकळले. पैसे दिल्यानंतर काम होत नसल्याने वाकोडकर यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर बोरसेला शुक्रवारी (ता.19) पोलिसांनी अटक केली.

श्रीनिवास श्रीपाद कुलकर्णी (रा. एन 1, सिडको) हे भाजप कार्यकर्ते आहेत. त्यांनी पैठण औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळावा म्हणून अर्ज दिला होता. ते प्लॉटच्या पाठपुराव्याचा भाग म्हणून जुलै 2016 मध्ये पैठण एमआयडीसी कार्यालयात गेले होते. त्या वेळी त्यांची बोरसेशी भेट झाली. बोरसेने रावसाहेब दानवे यांच्या जवळचा नातेवाईक असल्याचे भासवून प्लॉट मिळवून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर 4 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडीच लाख रुपये घेतले. त्यानंतर काहीही हालचाल न झाल्याने कुलकर्णी यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दुसऱ्या घटनेत विकास वसंतराव कुलकर्णी (रा. वानेगाव, ता. फुलंब्री, सध्या रा. श्रीकृष्णनगर, हडको) यांचे मित्र गणेश दांगोटे (रा. वानेगाव, ता. फुलंब्री) यांना नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन बोरसेने दिले होते. तडजोडीनंतर दोन लाख रुपये सध्या द्यावेत असे ठरले. त्यानुसार पैसे मिळाले तरी तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात येताच विकास कुलकर्णी यांनी वाळूज पोलिसांकडे तक्रार दिली.

Web Title: two crime registration on ganesh borase oppose