बीड जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, मात्र कोरोना अहवाल निगेटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

बोअरवेलच्या गाडीवर काम करणारा ओरिसा राज्यातील ४० वर्षीय मजूर सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास असल्याने सोमवारी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल झाला. दुसरा मृत्यू जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्तीचा झाला.

बीड/अंबाजोगाई - कोरोना अहवाल निगेटीव्ह असलेल्या दोघांचा मंगळवारी (ता. १४) मृत्यू झाला. एकावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील तर एकावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. 

बोअरवेलच्या गाडीवर काम करणारा ओरिसा राज्यातील ४० वर्षीय मजूर सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास असल्याने सोमवारी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल झाला. कोरोना आजाराच्या निदानासाठी त्याचे स्वॅब घेऊन पुण्याला पाठविले. त्याचा अहवाल येण्यापूर्वी सकाळी साडेनऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर काही वेळाने त्याच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.

हेही वाचा - कोरोनाशी लढा - आरोग्य विभागाने खर्च केले सव्वा कोटी

तर, दुसरा मृत्यू जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्तीचा झाला. औरंगाबाद जिल्ह्यातून छुप्या मार्गाने जिल्ह्यात आलेल्या महंतटाकळी (ता. गेवराई) येथील व्यक्तीदेखील स्वत: तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या स्वॅबचा अहवाल सोमवारी (ता. १३) निगेटीव्ह आला होता. त्याचाही मंगळवारी मृत्यू झाला. आता संबंधिताचे दुसऱ्यांदा स्वॅब घेतले असून कोरोनाची दुबार चाचणी घेण्यात येणार आहे. यासह स्वाईन फ्ल्यूचीही चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two deaths in Beed district, however, Corona report negative