भरधाव ट्रकच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू

अपघात
अपघात

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटासायकलला जोराची धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद-बीड महामार्गावरील आडगाव फाटा (ता. औरंगाबाद) येथील अंबिका हॉटेलजवळ रविवारी (ता. 20) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मोटारसायकलस्वार औरंगाबादकडून चित्तेपिंपळगावकडे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोराची धडक दिली.

यात मोटारसायकलस्वार गोपाल गंगाधर वाघ (वय 19, रा. चित्तेपिंपळगाव) हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. मयूर देविदास रणवीरे (वय 15, रा. घुलेगाव, ता. येवला, जि. नाशिक) याचा रात्री आठच्या सुमारास औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयूर हा दिवाळीनिमित्त चित्तेपिंपळगाव येथे मावशीकडे आला होता.


अपघात होताच ट्रकचालकाने ट्रक जागेवर सोडून पळ काढला. गोपाल वाघ याच्यावर चित्तेपिंपळगाव येथील स्मशानभूमीत रात्री साडेनऊच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा तपास हवालदार एस. के. साळवे, मांडवे, पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक सुरोशे, दीपक देशमुख हे करीत आहेत.

बेशिस्त वाहतूक
झाल्टा फाटा ते आडगाव फाट्यापर्यंत बेशिस्तीत रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. झाल्टा फाटा ते आडगाव फाट्यापर्यंत हॉटेलवर व परिसरात वाहन दुरुस्ती गॅरेजवर ट्रक, वाहने दुरुस्त करण्यासाठी रोज बेशिस्तीत रस्त्यावर नो पार्किंगमध्ये व ट्रकचालक रस्त्यावरच आपली वाहने उभी करतात. त्यांच्यावर स्थानिक पोलिस व महामार्ग पोलिसांची काहीही कारवाई होत नसल्याने गेल्या सहा महिन्यांत आतापर्यंत झाल्टा ते आडगाव फाट्यापर्यंत अनेकांना आपला जीव गमावा लागला, तर अनेकांना अपघातात जखमी झाल्याने अपंगत्व आले आहे. दोन दिवसांपूर्वीच झाल्टा फाटा येथे ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने यात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला होता. या बेशिस्त वाहनांवर व गॅरेज, हॉटेलचालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com