जरिनच्या 'झलक'साठी तुंबळ हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

औरंगाबाद - एका मोबाईल शॉपीच्या उद्‌घाटनासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील कॅनॉट प्लेस येथे चित्रपट अभिनेत्री जरिन खान आली होती. या कार्यक्रमासाठी शोरूम मालकाने कुठलाही पोलिस बंदोबस्त न घेता खासगी बाउन्सर तैनात केले होते. चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्याने बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची सुरू होऊन तुंबळ हाणामारी सुरू झाली. यात अभिनेत्री जरिनसुद्धा मागे राहिली नाही, तिनेही एका चाहत्याच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे अभिनेत्री जरिन खान हिला तब्बल दोन तास शोरूममध्येच अडकून पडावे लागले.

जरिनला पाहण्यासाठी कॅनॉट प्लेस परिसरात युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. प्रसंगी चाहते आणि बाउन्सर यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारीला सुरवात झाली. या वादात दोन गट एकमेकांना भिडले आणि या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. हाणामारीमुळे परिसरात गदारोळ, धावपळ सुरू झाली. यात एक चाहता जरिनच्या जवळ गेला असता तिने त्याच्या कानशिलात वाजवली. या वेळी संतप्त तरुणांनी बॅरिकेड्‌स आणि उभ्या असलेल्या दुचाकी फोडल्या.

Web Title: Two Group Fighting for Jarin Khan Watching