टेंपो-दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

मालवाहू टेंपो व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जेवळी (जि.उस्मानाबाद) ः मालवाहू टेंपो व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवारी (ता.27) रात्री सातच्या सुमारास येथील बेन्नीतुरा नदीच्या पुलावर घडली.

वडगाववाडी (ता.लोहारा) येथील नागनाथ श्रीशैल बोडके (वय 20) व विनायक प्रभाकर बोडके (वय 21) हे दोघे मंगळवारी दुचाकीने (एमएच-14, बीएच-4453) आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी अचलेरकडे निघाले होते. जेवळी येथील राजमार्गावरील बेन्नीतुरा नदीच्या पुलावर असताना सायंकाळी सातच्या सुमारास जळकोटवरून लोहाऱ्याकडे निघालेल्या मालवाहू टेंपोने (एमएच-25, एजे-0604) दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील नागनाथ बोडके व विनायक बोडके हे दोघेही जखमी झाले. नागरिकांनी जखमींना उपचारासाठी तत्काळ उमरगा येथील रुग्णालयात पाठविले. दरम्यान, विनायक बोडके याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सोलापूरला हलविण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two injured in accident