दोन अपघातांत जखमी दोन जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेंद्रा फाटा व शेंद्रा एमआयडीसीच्या लिभेर चौकात शुक्रवारी (ता.27) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात जखमी झालेल्या दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. केसरबाई पिराजी शेजूळ (60, रा. शेंद्रा कमंगर झोपडपट्टी, ता.औरंगाबाद), शाकीर बशीर शेख(वय 30, रा. हिनानगर, चिकलठाणा, ता. औरंगाबाद) अशी अपघातातील मृत पावलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी (ता.27) केसरबाई या चिकलठाणा येथील आठवडे बाजारला गेल्या होत्या.

करमाड  (जि.औऱंगाबाद) : चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेंद्रा फाटा व शेंद्रा एमआयडीसीच्या लिभेर चौकात शुक्रवारी (ता.27) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात जखमी झालेल्या दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
केसरबाई पिराजी शेजूळ (60, रा. शेंद्रा कमंगर झोपडपट्टी, ता.औरंगाबाद), शाकीर बशीर शेख(वय 30, रा. हिनानगर, चिकलठाणा, ता. औरंगाबाद) अशी अपघातातील
मृत पावलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी (ता.27) केसरबाई या चिकलठाणा येथील आठवडे बाजारला गेल्या होत्या.

बाजार करून त्या शेंद्रा येथे खासगी वाहनातून आल्या. घरी जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना औरंगाबादकडे वेगाने जात असलेल्या इंडिका कारने केसरबाईंना जोराची धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी फाट्यावरील ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कारमधूनच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्या उपचारास प्रतिसाद देत नसल्याचे पाहून कारचालकाने कार सोडून रुग्णालयातून पोबारा केला होता. कुटुंबातील सदस्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या अपघातात आचारी ठार

याच दिवशी दुसरा अपघात जालना महामार्गावरील शेंद्रा एमआयडीसीच्या लिभेर चौकात घडला. शाकीर शेख हे शेंद्रा एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करीत होते. दररोजप्रमाणे आपले काम आटोपून ते चिकलठाणा येथे जाण्यासाठी निघाले. नेहमीप्रमाणे लिभेर चौकातील एका पान टपरीवर सिगारेट घेऊन ते दुचाकीजवळ येऊन ते ओढत असताना जालन्याकडे जाणाऱ्या एका कारचालकाने त्यांना जोराची धडक देत तो कारसह फरारी झाला. जखमी शाकेर यास घाटी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (ता.28) सदर दोनही अपघातांची चिकलठाणा पोलिसांनी नोंद घेतली. यातील दोन्ही कारचालकाविरुद्ध कार बेदरकार चालवून दुसऱ्याच्या जीवितास कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार आबासाहेब देशमुख, जमादार दिनकर थोरे करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Injured People Died