विजेचा धक्‍क्‍याने दोन भाविकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

तुळजापुरात शहरात घडलेली घटना 

तुळजापूर (उस्मानाबाद) ः शहरातील एका पार्किंगजवळ विजेच्या खांबाचा धक्का लागून कर्नाटकातील दोन भाविकांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. सहा) पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जगदाळे पार्किंगजवळ रविवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास विजेच्या खांबाचा धक्का लागून मुकेश भीमशा बेलकुंडे (वय 19) व विनोद मारुती शेरेकर (17, दोघेही रा. कवडियाल, ता. बसवकल्याण, जि. बिदर) या दोन युवकांचा मृत्यू झाला. येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर दुपारी चारच्या सुमारास मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. 

दरम्यान, जगदाळे पार्किंगचे मालक सूरज हरिश्‍चंद्र जगदाळे (रा. तुळजापूर) यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना झाल्याची फिर्याद लखन विठ्ठल शेरेकर (रा. कवडीयाल) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in accident