बेकायदा साठविलेली दोन लाखांची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते वृत्त
‘अवैध दारूविक्री बोकाळली’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने २२ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांनीही कारवाई केली आहे. राष्ट्रीय व राज्य मार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत मद्यविक्रीला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे अवैध दारूविक्री बोकाळली आहे. बनावट मद्य ठराविक विक्रेत्यांना विक्री करणारी टोळी शहरात कार्यरत असल्याच्या संशयामुळे कळंब तालुका राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हिटलिस्टवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कळंब - शहरातील दत्तनगरात राहणाऱ्या विजय कदम यांच्या घरातून बेकायदा साठवणूक करून ठेवलेली दोन लाख रुपयांची दारू राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिसांनी गुरवारी (ता.२७) दुपारी एक वाजेच्या सुमारास जप्त केली. दरम्यान, विजय कदम फरारी झाला असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांनी सांगितले. पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारी २० एप्रिल रोजी शहरातील परळी रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोवा फॉर सेल असे नमूद असलेले १०९ मद्याचे बॉक्‍स टेंपोसह पकडले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून मद्य तस्करी करणाऱ्याला पळवून नेल्याप्रकरणी शहरातील विजय कदम याच्याविरुद्ध उस्मनाबादच्या आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे उस्मानाबादचे पोलिस आरोपीच्या शोधात गेल्या दोन दिवसांपासून तैनात आहेत. दरम्यान गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास कदम याच्या घरावर कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील नेवसे, आनंदनगर पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी फौजदार दराडे, उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक मिलिंद गरुड, निरीक्षक राजकुमार राठोड यांनी संयुक्तरीत्या छापा मारला. या वेळी विविध कंपन्यांच्या मद्याच्या एक लाख ९९ हजार रुपये किमतीच्या बाटल्या घरात बेकायदा साठवणूक करून ठेवलेल्या आढळल्या. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, विजय कदम फरारी असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. 

Web Title: Two lakhs of liquor was seized