शेत आखाड्यात आक्रोश अन्‌ हंबरडा! 

मंगळवार, 19 मार्च 2019

अरे, तो आत गेला... अगं तो बेशुद्ध झाला... पळा लवकर, चला चला म्हणेपर्यंत दोघांचा बळी गेला अन्‌ तिसरा गटारीत गडप झाला. कुणाचा बाप, पती गेला, तर कुणाच्या भावाची शुद्ध हरपली. जमिनीवर अंग सोडून कुणी हंबरडा फोडत होते. कुणी एकमेकांचा आधार घेत असहाय झाले होते... हे चित्र काळीज पिळवटून टाकत होते. 

औरंगाबाद - अरे, तो आत गेला... अगं तो बेशुद्ध झाला... पळा लवकर, चला चला म्हणेपर्यंत दोघांचा बळी गेला अन्‌ तिसरा गटारीत गडप झाला. कुणाचा बाप, पती गेला, तर कुणाच्या भावाची शुद्ध हरपली. जमिनीवर अंग सोडून कुणी हंबरडा फोडत होते. कुणी एकमेकांचा आधार घेत असहाय झाले होते... हे चित्र काळीज पिळवटून टाकत होते. 

दोघांचा अचानक गुदमरून मृत्यू झाल्याने कावडेंच्या शेतातील आखाड्यावर हंबरडे फुटत होते. डोळ्यांत आसवं आणि छातीवर पर्वताएवढे दुःखाचे आझे घेऊन कलावतीबाई माने सांगत होत्या, ""मोलमजुरी करणारी कष्टकरी माणसं आम्ही. दगडवाडी, राजूर भागातून पाच वर्षांपूर्वी पोट भरण्यासाठी पती रामकिसन, मुलगा शिवशंकरसोबत आलो. तीनपैकी एका मुलीला तरुणपणीच वैधव्य आले. तीही वस्तीवरच राहते. कसेबसे जगताना मुलगा मात्र एका फायनान्स कंपनीत कामाला लागला. त्यातच सहा महिन्यांपूर्वीच जावई रामेश्‍वर डांबे पत्नी व दोन लेकरांसह येथे आले. आज सकाळी गुडघेदुखीवर उपचार घेण्यासाठी जावयासोबत बदनापूरला गेले. तेथून परत आल्यानंतर हातावर भाकर टेकत नाही तोच एकजण आला अन्‌ मालकाला
(रामकिसन) बोलावणं आलं. गटारात तिघे पडले बघा... चला लवकर... असे सांगताच तेही ताडकन उठले. हे पाहून मागोमाग जावई गेले. जाऊ नका म्हणलं; पण ऐकलं नाही हो... जावई बाहेरच नाही आले हो...'' हे सांगताना दुःख गालावरून ओघळत होते. 
 

कालच मुलीला पाहायला पाहुणे आलते... 
जनार्धन साबळे यांच्या पत्नी आक्रोश करीत सांगत होत्या, ""पंचवीस वर्षांपासून आखाड्यावर राहतो. काबाडकष्ट करून मालकाकडे पोट भरतो. कालच मुलीला पाहायला पाहुणे आलते आणि आज असं झालं. हे सगळं पाहून मुलगा आदित्य भेदरलाय. त्याला दवाखान्यात नेलं. कसा असंल तो? साहेब, आता आम्हाला काय भेटता, आमच्या माणसांकडं पाहा, त्यांना लवकर घरी आणा!'' असा सवालच त्यांनी भेटीसाठी आलेल्या हरिभाऊ बागडे व अन्य पदाधिकाऱ्यांना केला. त्यांच्या या प्रश्‍नांतून साबळे कुटुंबीयांचे अंधकारमय भविष्यच जणू दिसत होते. 

भयावह दृश्‍य पाहून तो अत्यवस्थ झाला 
मॅनहोलमध्ये झालेली घटना वीस वर्षीय तरुणाने पाहिली. आपले आप्तेष्ट गुदमरलेले पाहून आखाड्यात येताच त्यालाही ग्लानी आली. लगेचच त्याला रुग्णालयात भरती करावे लागले. 
 
कोवळ्या मनांची चलबिचल 
या घटनेने मोठ्यांची मनं सुन्न झाली; पण कोवळ्या मनांत चलबिचल होती. आई का रडते, ताई का रडते हेही त्यांना लवकर उमजेना. रामेश्‍वर डांबे यांची दीड वर्षाची चिमुकली तर झोक्‍यात शांत झोपली होती. चेंबरच्या खाईत हरवलेल्या बापाबद्दल तिला यत्किंचितही कल्पना नव्हती. तिचीच आई मात्र जमिनीवर अंग
सोडून आपलं दुःख व्यक्‍त करीत होती. 
 

तिघांना बाहेर काढले 
मी आलो तेव्हा तीन माणसं मॅनहोलमध्ये दिसली. दोरी बांधून जवान आत गेले. बेशुद्धावस्थेत आम्ही तिघांना बाहेर काढले. त्यात दोघे मृत झाल्याचा अंदाज आला. लोकांचं म्हणणं होतं, अजून एकजण गायब आहे. त्यामुळे घटना घडली तेथील व समोरील मॅनहोलदरम्यानचे चेंबर फोडले. त्यात दोरी टाकण्याचा प्रयत्न केला. दोरी आरपार निघाली नाही. शंभर फुटांवर ती अडकली. त्यामुळे तरुण चेंबरमध्ये अडकला असावा म्हणून दोन जेसीबीद्वारे चेंबरची पाइपलाइन फोडत आहोत. रात्री दहापर्यंत त्याचा शोध लागला नाही. पाइपमध्ये जेसीबीचे समोरील तोंड जात नसल्याने पोकलेन आणून काम करीत आहोत. जोपर्यंत मृतदेह निघणार नाही तोपर्यंत काम रात्रीही सुरूच राहील. लाइटची व्यवस्थाही केली आहे, असे अग्निशमन विभागाचे
मोहन मुंगसे यांनी सांगितले. 
  
रुग्णवाहिकाच तिथे नेली 

घटनेची माहिती समजताच आम्हाला ऍलर्ट करण्यात आले. आम्ही रुग्णवाहिका घटनास्थळी नेली. तिथून अत्यवस्थ झालेल्यांना लगेचच रुग्णालयात आणले व त्यांच्यावर उपचार सुरूआहेत, असे धूत रुग्णालयाचे पर्यवेक्षक एम. ए. खान यांनी सांगितले. 
 
श्‍वास जात होता वर 
मॅनहोलमध्ये विषारी वायूने एकापाठोपाठ एकजण अत्यवस्थ होत होता. जसे जसे एकेकाला बाहेर काढले जात होते तसे तसे हंबरडे फुटत होते. नातेवाइकांचा श्‍वास वर जात होता. घाबरलेली अवस्था आणि चिंता, काळजी उरी जाणवत होती. हे दृश्‍य पाहून अनेकजण हादरून गेले; तर उग्र वासामुळे अनेकांना त्रासही जाणवला. 

यामुळे ते अत्यवस्थ झाले 
मॅनहोलवर सिमेंटचा ढापा टाकला जातो; परंतु ढाप्याच्या वर्तुळातही आत घुसण्यासाठी गोलाकार जागा आहे. मॅनहोलमध्ये जाण्यासाठी त्याच छोट्या जागेतून शेतकरी व बटईदार वापर करीत होते; परंतु आत विषारी वायू निर्मिती झालेली होती. त्याने व ऑक्‍सिजनअभावी गुदमरून दोघांचा मृत्यू झाला; तर काही अत्यवस्थ झाले; पण अग्निशमन दल आले तेव्हा त्यांनी आधी सिमेंटचे ढापे काढले. त्यामुळे विषारी वायू हवेत मिसळला व मॅनहोलमध्ये ऑक्‍सिजन पुरवठा झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांना बाहेर काढताना वायूची अडचण झाली नाही. 

 

Web Title: Two people dies due to drowning in drainage line at Aurangabad