रांजणगावातील अपहृत दोन बहिणी सुखरूप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

औरंगाबाद - शाळेतून घरी येताना गायब झालेल्या रांजणगावातील दोन सख्ख्या बहिणींचे अपहरणच झाल्याचे उघड झाले आहे. अपहरणाचे बिंग फुटताच अपहरणकर्त्याने दोघींना औरंगाबादेत बसने पाठवून दिले. या मुली मंगळवारी (ता. 25) घरी सुखरूप पोचल्या. गुप्तधनाच्या लालसेपोटी अपहरण झाले असावे असा संशय पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद - शाळेतून घरी येताना गायब झालेल्या रांजणगावातील दोन सख्ख्या बहिणींचे अपहरणच झाल्याचे उघड झाले आहे. अपहरणाचे बिंग फुटताच अपहरणकर्त्याने दोघींना औरंगाबादेत बसने पाठवून दिले. या मुली मंगळवारी (ता. 25) घरी सुखरूप पोचल्या. गुप्तधनाच्या लालसेपोटी अपहरण झाले असावे असा संशय पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी व्यक्त केला. 

शीतल ज्ञानोबा रासवे (वय : बारा) व वैष्णवी (वय : दहा) अशी सुटका झालेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत. शीतल ही सातवीत, तर वैष्णवी ही पाचवीत शिक्षण घेते. शुक्रवारी (ता. 21) सकाळी सात वाजता रांजणगाव येथील जिजामाता शाळेत त्या परीक्षेसाठी गेल्या होत्या. पेपर संपल्यानंतर अकरा वाजेपर्यंत घरी येणे अपेक्षित होते; मात्र त्या दोघीही घरी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेतला; मात्र माहिती मिळाली नाही. त्यामुळे रासवे कुटुंबीयांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या संदर्भात उपायुक्त वसंत परदेशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली, की परीक्षेनंतर घरी परतणाऱ्या दोघी बहिणींना नानासाहेब सोनाजी अभंग (वय : 45, रा. रांजणगाव) याने एमएटी दुचाकीवर बसवून त्यांचे अपहरण केले. फुलंब्री, वाशी, भुसावळ, संगमनेर, जुन्नर, बाभूळगाव, शेगाव आदी ठिकाणी त्यांना एमएटीवरच फिरवले. दुसरीकडे गुन्हेशाखा पोलिसांनी वाळूज ठाण्याच्या पोलिसांसह तपास सुरू केला. सायबरसेलने त्याचे मोबाईल लोकेशन मिळवले. मात्र, पोलिसांचा माग व कुटुंबीयांची पोलिस चौकशी करीत असल्याने त्याने दबावापोटी मुलींना बाभळेश्‍वर (ता. श्रीरामपूर) येथून बसने औरंगाबादला पाठवले. मुलींना रांजणगावात उतरून द्या, अशी सूचनाही अभंग याने वाहकाला केली. रांजणगावात मुली पोचताच त्यांनी रिक्षाने मामाचे घर गाठले. ही बाब समजताच कुटुंबीयांना व पोलिसांना मुलींच्या मामाने माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलींची चौकशी केली. मुलींच्या शोधासाठी सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, रामेश्‍वर थोरात, निरीक्षक मधुकर सावंत, नाथा जाधव, उपनिरीक्षक अनिल वाघ, विजय पवार, शेख ताहेर, लक्ष्मण उमरे, सायबर सेलचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, कोरंटलू, मनोज चौहान आदींनी केली. 

गुप्तधनासाठी अपहरण? 
संशयित आरोपीच्या घरात मांडूळ जातीचा साप सापडल्याने गुप्तधनासाठी मुलींचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच त्यांची विक्री करण्याचाही उद्देश असू शकतो असे पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले. 

संशयित अभंग हा मूळ श्रीरामपूर येथील असून, सात ते आठ महिन्यांपासून तो पत्नीसोबत रांजणगावात अपहृत मुलींच्या घराशेजारी राहत होता. त्याच्याविरुद्ध तोफ चोरी केल्याचा गुन्हा नोंद आहे. त्याने कोणत्या कारणासाठी मुलीचे अपहरण केले याचा उलगडा झालेला नाही. 

Web Title: Two sisters safely