शेततळ्याच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून चुलत भावांचा मृत्यू

हबीबखान पठाण
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पोहण्यासाठी गेलेल्या दहावीतील सोळा वर्षीय दोन सख्या चुलत भावांचा शेततळ्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना थेरगाव (ता.पैठण) येथे बुधवारी (ता.13) दुपारी एकच्या सुमारास घडली.

पाचोड (जि.औरंगाबाद) ः पोहण्यासाठी गेलेल्या दहावीतील सोळा वर्षीय दोन सख्या चुलत भावांचा शेततळ्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना थेरगाव (ता.पैठण) येथे बुधवारी (ता.13) दुपारी एकच्या सुमारास घडली.

थेरगाव येथील स्व. सुरजबाई बाकलीवाल विद्यालयाचे विद्यार्थी सोमनाथ बप्पासाहेब गोलांडे व त्याचा चुलत भाऊ सोपान रमेश गोलांडे हे शाळेचा पहिलाच दिवस असल्याने घरच्यांना शाळेत चालल्याचे सांगून मित्रासमवेत गावालगत असलेल्या सरकारी गायरान जमिनीत शेततळ्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात दहा-पंधरा फुट पाणी असल्याने पोहायला शिकण्यासाठी गेले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले.

आजुबाजूला कुणीच नसल्याने त्याना वाचविण्यासाठी कुणी मदतीला आले नाही. यात त्या दोघांचा मृत्यू झाला. काही वेळाने रस्त्याने जाणाऱ्या व गुरे चारणाऱ्या गुराख्यांना पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे दिसले असता त्यांनी गावात फोन करून सांगितले. गावांत घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना पाण्याबाहेर काढून त्यांना तातडीने खासगी वाहनाद्वारे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुधीर पोहरेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहित जैन, डॉ.साकिब सौदागर, डॉ.इफ्फत सौदागर, डॉ.संदीप काळे, डॉ.राहुल दवणे, डॉ. शिवाजी भोजने आदींनी तपासून मृत घोषित केले.
काही वेळाने ग्रामीण रुग्णालयात सोमनाथ व सोपान या दोघांचे आई-वडिल व नातेवाईक आले. त्यांनी समोर मुलांचे मृतदेह पाहून टाहो फोडला.

या घटनेची माहीती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे जमादार जगन्नाथ उबाळे व हनुमान धनवे यांना पंचनामा केला. डॉ. रोहीत जैन यांनी उत्तरणीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस जमादार जगन्नाथ उबाळे व हनुमान धनवे करीत आहेत.

एकुलता मुलगा
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेतील मृत सोपान हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. सोमनाथ यास एक भाऊ आहे. आतापावेतो या वर्षभरात शेततळ्यात बुडून थेरगावात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुलांच्या पालकांनी पोहण्यासाठी जात असलेल्या मुलाची काळजी घेणे गरजेचे आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Step Brothers Drowned In Farm Ponds