दोन हजार औरंगाबादकरांनी दिले अठरा लाखांचे साहित्य

संकेत कुलकर्णी
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

  • अभ्युदय फाऊंडेशनचा पुढाकार
  • मदतीचे ट्रक कोल्हापूरकडे रवाना

औरंगाबाद : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभ्युदय फाऊंडेशनने आवाहन केले आणि सुमारे दोन हजार औरंगाबादकरांनी तब्बल 10 हजार पाण्याच्या बाटल्या, 6 हजार बिस्कीट पुडे, खाद्यान्नाची पाकिटे, चादरी, ब्लॅंकेट्‌स, स्वेटर्स, चटया आणि नवेकोरे कपडे, असे सुमारे अठरा लाख रुपये किंमतीचे साहित्य आणून दिले. या मदतीचा ट्रक आणि स्वयंसेवकांची फौज सोमवारी (ता. 12) कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहे. 

अस्मानी संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी जीवनावश्‍यक वस्तू देण्याचे आवाहन अभ्युदय फाऊंडेशनने औरंगाबादकरांना केले होते. सुमारे दोन हजार नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत चार दिवसांत सुमारे 18 लाख रुपये किंमतीचे मदत साहित्य आणून दिले. सरकारी यंत्रणेच्या भरवशावर विसंबून न राहता ही मदत थेट ग्रामीण भागात नागरिकांच्या हातात पोहोचवण्यासाठी अभ्युदयच्या स्वयंसेवकांची फौजच सोमवारी सायंकाळी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. शाहूवाडी, राधानगरी आणि बिद्री या तीन तालुक्‍यांतील खेड्यापाड्यांत हे ट्रक जाऊन मदत पोहोचती करणार आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या स्थानिक शाखेचेही सहकार्य मिळत आहे. 

प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सुहास तेंडुलकर, डॉ. रेखा शेळके, अभ्युदय चे अध्यक्ष नीलेश राऊत, सुबोध जाधव, उमेश राऊत, प्रतीक राऊत, मंगेश निरंतर, गणेश घुले, श्रीकांत देशपांडे, डॉ. संदीप शिसोदे, मयूर देशपांडे, दीपक जाधव, महेश अचिंतलवार, श्रीराम पोतदार, निखिल भालेराव, स्वप्नील जोशी, ओंकार तेंडुलकर, ज्ञानेश बोद्रे, उमाकांत पांडे, गिरीश जोशी, कस्तुरी जोशी, अक्षय गोरे, कृष्णा जाधव, अतुल राऊत, कचरू जाधव, नवनाथ घोडके, ज्ञानेश्वर पाटील, आदित्य दिवाण, आभिजित हिरप, बाबू स्वामी, कुशल पाटणी, त्रिशूल कुलकर्णी, विजय मगरे, मुकेश अडाणी, रवी सलगर, सागर अहिरे, संतोष लोमटे, चक्रधर डाके, गजानन लोमटे, राजंद्र वाळके, यांची यावेळी उपस्थिती होती. 

फॅमिली किटची कल्पकता 

लोकांकडून आलेल्या मदत साहित्याचे एमजीएम नर्सिंग कॉलेजच्या सुमारे 200 विद्यार्थिनी सॉर्टिंग करत आहेत. प्रत्येकी एका कुटुंबाच्या गरजेनुसार या साहित्याची फॅमिली किट बनवण्यात येत आहे. अनेकांनी पूरग्रस्तांची खरी गरज ओळखून नव्याकोऱ्या कपड्यांचे जोड आणि अंतर्वस्त्रेदेखील खरेदी करून दिली आहेत. दोन दिवसांतच या सुमारे 4 हजार फॅमिली किट घेऊन आणखी दोन ट्रक पाठवले जातील, असे नीलेश राऊत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two thousand aurangabadkars donated daily needs to flood affected people