दुचाकीला धडकून कार घुसली हॉटेलात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघाताची मालिका सुरुच असल्याने रस्त्यावरील ब्लॅकस्पॉटकडे (अपघात प्रवर्षण ठिकाण) राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाने वळणे सरळ करण्यासह महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.

पाचोड : रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस जोराची धडक दिल्यानंतर भरधाव वेगातील कार हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता.१०) पाचोड (ता. पैठण) जवळ जामखेड फाट्यानजीक घडली.

Accident in Pachod

ज्ञानदेव दोरखे (वय १९), सुरेश दोरखे (वय १०) व मिराबाई संतोष मोरे (वय २८, सर्व रा.दावरवाडी, ता.पैठण) हे मुलाला कुत्रा चावल्याने उपचारासाठी काजळा (ता. अंबड) येथे दुचाकीवरून (क्र. एम.एच. २१ बी.के. ९४२८) जात होते. ते जामखेड फाट्याजवळ औरंगाबाद -सोलापूर महामार्ग ओलांडत असताना औरंगाबादकडून बीडकडून भरधाव वेगात जाणाऱ्या कारने (क्र. एमएच २० इ.जे. ६८३७ ) त्यांना जोराची धडक दिली, त्यात कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगत असलेल्या पाचोड येथील सय्यद मुनवर दगडू यांच्या 'सहारा टी हाऊस' या हॉटेलमध्ये घुसली.

पत्नीसोबतच्या संबंधांचे भूत डोक्यात शिरले, आणि...

कार आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून हॉटेलमधील ग्राहक बाहेर पळाले. मात्र हॉटेलमधील कामगार गफ्फार सांडु शेख (वय ३५) यात जखमी झाला; तर दुचाकीवरील मिराबाई मोरे, ज्ञानदेव दोरखे, सुरेश दोरखे हे तिघेही गंभीररित्या जखमी झाले. या सर्व जखमींच्या डोक्या व हाता- पायाला गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर कारचालक घटनास्थळाहून वाहन सोडून जखमींना मदत न करताच पसार झाले.

स्कॉर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह

या अपघाताची माहिती पथकर (टोलनाका) वरील कर्मचाऱ्यास माहीती मिळताच रुग्णवाहिका चालक गणेश चेडे व महेश जाधव, रवि गाढे यांचेसह उपस्थितांनी त्यांना रुग्णवाहिकेतून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. या जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित जैन यांनी प्रथमोपचार केल्यानंतर औरंगाबादला हलविण्यात आले. पाचोड पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड व जमादार सुधाकर मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

धोकादायक वळणे सरळ करायची कधी?

या महामार्गाच्या रूंदीकरणाप्रसंगी रस्त्यावरील सर्व वळणे सरळ करण्याचे नियोजन होते; मात्र बहुतांश ठिकाणी या कामाकडे काणाडोळा झाल्याने अपघाताचे प्रमाण किंचितही कमी झालेले नाही. गावाजवळ भुयारी मार्ग, पादचारी मार्ग, गतिरोधक बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब काळे, धनराज भुमरे, कैलास भांड आदींनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Wheeler Car Accident Near Pachod Aurangabad