दुचाकीचोरांना लगाम केव्हा लावणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

लातूर - स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खुनाची चर्चा राज्यभर झाल्याने या घटनेचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास लावला. हेच पोलिस दुचाकीचोरांचा बंदोबस्त लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे दुचाकीचोरीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याने दुचाकीचोरांना लगाम केव्हा लावणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

लातूर - स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खुनाची चर्चा राज्यभर झाल्याने या घटनेचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपास लावला. हेच पोलिस दुचाकीचोरांचा बंदोबस्त लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे दुचाकीचोरीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याने दुचाकीचोरांना लगाम केव्हा लावणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

शिवाजी चौक ते गांधी चौक, औसा रस्ता, अंबाजोगाई रस्ता, बार्शी रस्ता या प्रमुख रस्त्यांवर दुचाकीचोरीच्या घटना घडत होत्या. त्यानंतर लहान रस्त्यांवरून, घरापासून दुचाकी पळविण्याचे प्रकार वाढले. ते थांबत नाहीत तोपर्यंत हे प्रकार तालुका, गावपातळीपर्यंत पोचले; पण या वाढत्या घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसाला शहर आणि जिल्ह्यात दोन ते चार दुचाकी चोरीला जात आहेत. गेल्या दोन दिवसांत पाचहून अधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबतच्या तक्रारी नोंदवूनही त्याचा तपास लागताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेवर शंका उपस्थित केली जात आहे. 

राघवेंद्र कॉलनीतील घरासमोर लावलेली सतीश माधवराव जाधव यांची दुचाकी सोमवारी (ता. २३) चोरांनी पळवली आहे. याप्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर परिसरात राहणारे उत्तम लहुजी जाधव यांनाही हाच अनुभव आला. त्यांची रविवारी (ता. २२) घरासमोरून दुचाकी पळविण्यात आली आहे. शहराच्या मध्यभागातून आक्रम करीमोद्दीन शेख यांचीही दुचाकी चोरट्यांनी पळवली आहे. या दोन्ही प्रकरणाच्या तक्रारी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी दाखल झाल्या आहेत. शहरातील घटनांप्रमाणेच तालुक्‍यातही दुचाकी चोरीच्या घटना दररोज उघड होत आहेत. गजानन खुशालराव इंगळे (रा. हाटग्याळ) यांची घरासमोरून दुचाकी पळविण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांनी उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी तक्रार दाखल केली आहे. असाच प्रकार रेणापूरमध्ये नुकताच घडला आहे. जगन्नाथ प्रभू आगरकर (रा. डिगोळ) यांच्या घरासमोरील दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यांनी या प्रकरणी रेणापूर पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी (ता. २४) तक्रार दाखल केली आहे.

सीसीटीव्ही कुचकामी
महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च करून पोलिसांना सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, मागील काही महिन्यांत शहरात अनेक गुन्हे घडूनही या यंत्रणेचा कुठेच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. वाहनांची चोरी ही रस्त्यांवरून झालेली असताना एकही चोर या सीसीटीव्हीत कसा कैद झाला नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे. यामुळेच ही यंत्रणा कुचकामी ठरल्याची भावनाही नागरिकांत आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात ही यंत्रणा सुरू आहे.

Web Title: two wheeler thief crime police