आमदार कपिल पाटील यांना ना. य. डोळे स्मृती पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

उदगीर - ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या नावे सुरू करण्यात आलेला पहिला स्मृती पुरस्कार आमदार कपिल पाटील यांना जाहीर झाला आहे. डॉ. डोळे यांच्या जयंतीदिनी रविवारी उदगीर येथील छात्रभारतीच्या माजी कार्यकर्त्यांनी एकत्र येत या पुरस्काराची घोषणा केली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण 28 जानेवारीला होणार आहे.

प्राचार्य डोळे यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या आदेशावरून पुण्याहून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील उदगीरसारख्या छोट्या शहरात राहण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अनेक मोठ्या संधी नाकारल्या. सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या विकासात प्राचार्य डोळे यांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. डोळे यांनी राष्ट्र सेवादलात महत्त्वाची भूमिका बजावली. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या विचारांमुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चळवळीचे बाळकडू मिळाले. त्यांच्या कार्याचे सतत स्मरण व्हावे आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी येथील छात्रभारतीच्या माजी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: uadgir marathwada news mla kapil patil n. y. dole smruti award