बीड राष्ट्रवादीला अच्छे दिन; शिवसेनेतून इनकमिंग

पांडुरंग उगले
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

शिवसेनेचे डॉ. उद्धव नाईकनवरे राष्ट्रवादीत; शह भाजपच्या नितीन नाईकनवरेंना 

माजलगाव : विधानसभेच्या तोंडावर माजलगावचे राजकारण चांगलेच तापत आहे. शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष डॉ. उद्धव नाईकनवरे यांनी बुधवारी (ता. सात) राष्ट्रवादीत प्रवेश केला. मतरझ त्यांचा हा प्रवेश सर्वकाही पदं भोगून भाजपात गेलेल्या नितीन नाइकनवरे यांना आहे.  डॉ. उद्धव नाइकनवरेंना माजीमंत्री प्रकाश सोळंकेंनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. 

आव्हान संघटना, शिवसेनेच्या माध्यमातून मतदारसंघातील तळागळात मोठी ताकद निर्माण करणाऱ्या डॉ. नाइकनवरेमुळे राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री (स्व.) सुंदरराव सोळंके यांच्यापासून किसनराव नाइकनवरे सोळंके कुटुंबासोबत आहेत. त्यांच्या एकनिष्टतेमुळे त्यांना विविध पदाचा मान सुरवातीपासूनच देण्यात आला आहे.

कट्टर समर्थक धर्मराज सावंत यांना डावलून माजलगाव साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पदही त्यांना देण्यात आले होते. त्यांच्याच आग्रहाखातर माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी माजी नगराध्यक्ष अशोक होके यांच्यावर अविश्वास ठराव आणून दहा वर्षपूर्वी नितीन नाइकनवरेंना बाजार समितीचे सभापतीपद बहाल केले होते. येवढेच नव्हे तर, पुन्हा एकदा माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील यांना बाजार समितीच्या सभापतिपदावरून हटवून नितीन नाइकनवरेंच्या गळ्यात माळ टाकली होती. या पदाच्या कारभारातून बाजार समितीचा आर्थिक भरभराट भरभराट केल्याचे चित्र रंगवण्यात आले.

नेत्यावर कायम आपलाच पगडा गाजवत दोन वर्षापूर्वी नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळविली; परंतु “सादोळ्याच्या गाईही, मंजरथला दान करता न आल्याने” पराभव पत्करावा लागला. यामुळे आता आपल्याला यापुढे नेता काहीच देणार नसल्याची कुणकुण लागल्याने  नितीन नाइकनवरेंनी भाजपात प्रवेश केला. यामुळे त्यांना शह देण्यासाठी सोळंकेंनी त्यांचेच चुलतबंधू डॉ. उद्धव नाइकनवरेंना राष्ट्रवादी घेऊन शह काटशहाचे राजकारान खेळले आहे.

डॉ. उद्धव नाइकनवरेंचा तळागाळात संपर्क
शहराच्या पालिका निवडणुकीतही विजय मिळविता न आलेल्या नितीन नाइकनवरेंपेक्षा डॉ. उद्धव नाइकनवरेंचा मतदारसंघातील तळागाळात संपर्क आहे. आव्हान संघटना, शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने राष्ट्रवादीला त्यांचा चांगलाच फायदा होणार यात काही शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Naiknaware enters in NCP beed