...तर कार्यालये बंद करू

...तर कार्यालये बंद करू

लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) - ‘शेतकऱ्यांना नाडाल, तर पीकविमा कंपन्यांची कार्यालये शिवसेना बंद करेल,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिला.

पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, यासाठी लासूर स्टेशन येथे शिवसेनेचे राज्यातील पहिले पीकविमा मदत केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन पीकविमा मिळवून देण्यासाठी शिवसेना पुढाकार घेत आहे. या केंद्राची पाहणी केल्यानंतर झालेल्या सभेत ठाकरे म्हणाले, ‘‘जगात जनावरे, बैलांना पुरणपोळी करून गोड खाऊ घालणारी आपली संस्कृती आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना छावणी, शेतकऱ्यांना धान्यपुरवठा आदी विविध प्रकारे मदत करण्याचे काम शिवसेनेने केले. शासनाच्या अनेक चांगल्या योजना खालपर्यंत पोचत नाहीत म्हणून अनेकदा ओरड होते. मात्र, याकडे शिवसेना लक्ष देणार आहे.’’ या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर,  माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.

देवयानी डोणगावकर म्हणाल्या, ‘‘जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षा म्हणून अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यातील २२ योजना यशस्वीरीत्या पूर्ण करता आल्या. यापैकी लासूर स्टेशन व १३ गावांची योजना पूर्ण होऊन तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या भागात टॅंकर पॉइंटची संख्या ३५ पर्यंत केली. त्यामुळे टॅंकर लवकर भरले जाऊ शकले आणि पुरवठा सुरळीतपणे होऊ शकला. माजी खासदार (कै.) साहेबराव पाटील डोणगावकर यांनी जायकवाडी जलाशयातून ७० हजार हेक्‍टरचा पाणी उचल परवाना १९८७ मध्ये राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला. तेव्हा ज्या सहकारी उपसा सिंचन योजना उभारल्या गेल्या, त्या बंद आहेत. त्या पुनर्जीवीत झाल्या तर मोठी मदत होईल.’’

अडचणी सोडवून घ्याव्यात
विमा कंपन्यांना इशारा देताना ठाकरे म्हणाले, ‘‘याद राखा, राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळाल तर गाठ शिवसेनेशी आहे. मुंबईतील या कंपन्यांची सर्व कार्यालये बंद करू. शिवसेनेने सुरू केलेल्या पीकविमा मदत केंद्रात शेतकऱ्यांनी अडचणी सोडवून घ्याव्यात.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com