अरे बाप ! एकशे पासष्ट कुटुंबाच्या गावात कोरोनाबाधितांची संख्या एवढी !

युवराज धोतरे 
Saturday, 5 September 2020

एकशे पासष्ठ कुटुबांची वाडी असलेल्या धोतरवाडीत तब्बल पंचवीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे गाव आता हॉटस्पॉट जाहिर करण्यात आले आहे.  

उदगीर (लातुर) : तालुक्यातील धोतरवाडी (देवर्जन) या वाडीत एकशे पासष्ट कुटुंब. एवढ्या छोट्याश्‍या वाडीत तब्बल पंचेवीस जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. ही वाडी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली असून पूर्ण वाडी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

दोन दिवसांपूर्वी धोतरवाडी येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचे शुक्रवारी (ता.४) हायरिस्क कॉन्टॅक्ट तपासण्यात आले असता परत नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शनिवारी (ता.५) देवर्जन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी जाधव यांच्या पुढाकाराने जलद अॅटीजेन तपासणी शिबिर घेऊन सत्याहत्तर जणांची तपासणी केली असता पंधरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत कापसे यांनी दिली आहे.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

यामुळे प्रशासनासह नागरिकामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान या वाडीत उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मंडळ अधिकारी गणेश हिवरे यांनी भेट देऊन पाहणी केली. सर्व ग्रामस्थांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. १६५ कुटुंबांतील साडेआठशे नागरिकांची तपासणी सुरू करण्याच्या व पूर्ण धोतरवाडी प्रतिबंधित क्षेत्र करण्याच्या सूचना यावेळी आरोग्य विभागाला देण्यात आल्या.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

सद्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 
उदगीर १०९९, जळकोट ४०, देवणी २९, चाकूर १८,  अहमदपूर १०, निलंगा ३, शिरूर अनंतपाळ ३, मुखेड १०, मुंबई ३, पुणे १, बिदर ७,  हैदराबाद १, लातुर १ अशा  कोरोणाची बाधा झालेल्या एकुण १२२५ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी ५४ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी ५७३ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. १३३ रुग्णांना घरी आयसोलेशन साठी ठेवण्यात आले आहे.२१० रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. सध्या कोविड रुग्णालयात ३६, लाॅयन्स नेत्र रूग्णालयात २७, जयहिंद वसतिगृह ८३ तर तोंडारपाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ७५ अशा एकुण २२१ अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत  देशपांडे यांनी दिली आहे.

मृत्यूदर साडेसहा वरून साडेचार टक्यावर... 
सध्या शहर व तालुक्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी तपासण्यांमध्ये वाढ झाल्याने आकडे वाढत आहेत. नागरिकांच्या तपासण्या करण्याकडे त्यांचा कल आहे. ६.५ टक्के असलेला उदगीरचा मृत्युदर हा आता कमी झाला असून तो साडेचार टक्क्यांवर आला आहे. या मूर्ती घरात घटवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतीष हरिदास यानी दिली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgeer Dhotarwadi twenty-five people corona positive