उदगीर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला होणार मतदान

युवराज धोतरे
Friday, 11 December 2020

उदगीर  तालुक्यातील होऊ घातलेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे.

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील होऊ घातलेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंबंधीचे आदेश निर्गमित केले असून तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक १५ डिसेंबर आहे. नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती ते २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विकली व स्वीकारली जाणार आहेत.

३१ डिसेंबर रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. चार जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्यादिवशी चिन्ह वाटप होणार आहेत. आवश्यकता पडल्यास १५ जानेवारी रोजी मतदान घेतले जाणार असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याचे निवडणूक नायब तहसीलदार श्री.गुट्टे यांनी सांगितले.

या गावांत होणार निवडणुका
उदगीर तालुक्यातील पहिल्या टप्प्यात अवलकोंडा, आडोळवाडी, बामणी, बेलसकरगा, बोरगाव, भाकसखेडा, चांदेगाव, चिगळी, डांगेवाडी, डोंगरशेळकी, दावणगाव, धडकनाळ, एकुर्का रोड, इस्मालपुर, गंगापूर, गूडसूर, गुरदाळ, हकनकवाडी, हंगरगा, हंडरगुळी, हाळी, हिप्परगा, हेर, होनीहिप्परगा, जकनाळ, कौळखेड, जानापूर, करडखेल, करखेली, करवंदी, कासराळ, किनी, कुमठा, कोदळी, खेर्डा, क्षेत्रफाळ, कुमदाळ (उदगीर),  लिंबगाव, लोणी, लोहारा, मादलापूर, मल्लापुर, माळेवाडी, मांजरी, नळगीर, निडेबन, पिंपरी, रुद्रवाडी, सुमठाणा, शिरोळ, शेल्हाळ, तादलापूर, टाकळी, वागदरी, वाढवणा (बु), वाढवणा (खु), येनकी, कुमदाळ (हेर), अरसनाळ या गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgir Block's 61 Grampanchayats Election On Next Year Latur News