उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पाला अखेरची घरघर

युवराज धोतरे
मंगळवार, 11 जुलै 2017

उदगीर - एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला व परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. प्रकल्पात अनेक तांत्रिक बिघाड असून अनेकवेळा दुरुस्त्या करुनही सुरु होत नसल्याने हा प्रकल्प शेवटची घटका मोजत असल्याची स्थिती आहे. 

उदगीर - एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला व परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. प्रकल्पात अनेक तांत्रिक बिघाड असून अनेकवेळा दुरुस्त्या करुनही सुरु होत नसल्याने हा प्रकल्प शेवटची घटका मोजत असल्याची स्थिती आहे. 

उदगीर येथे गेल्या तीन दशकांपासून शासनाने दुधावर प्रक्रिया करुन त्यापासून भुकटी तयार करण्याचा प्रकल्प सुरु केला, त्यावेळी उदगीर परिसरात दुधाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र दिवसेंदिवस दुधाचे उत्पादन कमी होत गेल्याने या प्रकल्पाला दूध कमी पडू लागले. मध्यंतरी काही दिवस या प्रकल्पाला पश्‍चिम महाराष्ट्रातून दूध मागवण्यात आले. त्यानंतर हळूहळू या प्रकल्पातील यंत्रे जुनी होत गेली. वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या.

दूध भुकटी तयार करण्यासाठी वापरात येणारे बॉयलर अनेक वेळा खराब होत असल्याने भुकटीचे उत्पादन बंद पडले. त्यानंतर तत्कालीन आमदार (कै.) चंद्रशेखर भोसले यांनी तत्कालीन दुग्धविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना उदगीरला आणून हा प्रकल्प दाखवून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. 

शासनाने त्यावेळी निधी दिला व प्रकल्पही सुरु झाला, मात्र पुन्हा दुधाची कमतरता भासू लागली. त्यानंतर पुन्हा तांत्रिक बिघाड आल्याने पुन्हा हा प्रकल्प बंद पडला. त्यानंतर गेल्या काही वर्षांपूर्वी आमदार सुधाकर भालेराव यांच्या प्रयत्नाने पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. काही काळ हा प्रकल्प पुन्हा सुरु झाला, मात्र बॉयलरच्या समस्येमुळे अद्यापही बंद आहे. शासनाने याकडे आता लक्ष देऊन उदगीरकरांसाठी अस्मितेचा असलेला हा प्रकल्प पुन्हा सुरु करावा, अशी मागणी आहे. या प्रकल्पातील खराब यंत्रे बदलून नव्याने निधीची तरतूद करून प्रकल्प सुरू करणे गरजेचे आहे.

महाव्यवस्थापक पद केले रद्द 
हा दूध भुकटी प्रकल्प बंद पडल्याने व सध्या आलेले दूध फक्त थंड करुन पुढे पाठवणे एवढेच काम येथे उरले असल्याने या प्रकल्पासाठी शासनाने निर्माण केलेले महाव्यवस्थापक पदच सध्या रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी दुग्धशाळा तंत्रशिक्षक असे पद ठेवण्यात आले असून यामुळे उदगीरकरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पाची अनेक वेळा दुरुस्ती करुन हा प्रकल्प सुरु करण्याचा शासनाने अनेक वेळा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही हा प्रकल्प सुरु झालेला नाही. सातत्याने तांत्रिक बिघाड होत असून शासनाने आता नव्याने नवीन तंत्रज्ञानयुक्त मशिनरी आणून हा प्रकल्प सुरु करावा, अशी आमची मागणी आहे. 
- सतीश पाटील, उदगीर.

दूध भुकटी प्रकल्पामुळे उदगीर पूर्वी महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. मात्र दिवसेंदिवस शासनाच्या उदासीन धोरणामुळे या प्रकल्पाला घरघर लागली आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरू करणे आवश्‍यक आहे. येथील कर्मचारीही शासनाने इतर ठिकाणी पाठवले असल्याने कर्मचारी संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे आवश्‍यक कर्मचारी व यंत्रणा पुन्हा उभारणे गरजेचे आहे.
- सतीश वाघमारे, उदगीर.

Web Title: udgir news milk