शिवसेना पक्षप्रमुख करणार बालेकिल्ल्याचा दौरा

मधुकर कांबळे
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

ओल्या दुष्काळाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आज जिल्ह्यात 

 औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला शंभर टक्‍के यश मिळाले. सहापैकी सहा जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले. यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळाच्या निमित्ताने नुकसानीच्या पाहणीसाठी रविवारी (ता. तीन) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. 

मराठवाड्यात रुजलेल्या शिवसेनेची पहिली शाखा या शहरातच सुरू झाली. यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असलेला हा जिल्हा आहे. विधानसभा निवडणुकीत मात्र या जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी केले आहे. नऊपैकी सहा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार होते. जिल्ह्यात शिवसेनेला शंभर टक्‍के विजय मिळाल्याने हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राहील असे या निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले आहे. याशिवाय महापालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांवरही शिवसेनेचेच वर्चस्व आहे. यामुळे शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही या जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे.

 

परतीच्या पावसाने राज्यभरात हाहाकार माजवला, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिराउन घेतला. मका, सोयाबीन, बाजरी, कांदा, ज्वारी या काढणी पश्‍चात पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तातडीने त्यांनी पक्षाच्या आमदारांना प्रत्येक तालुक्‍यांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे आदेश दिले. त्यानुसार आमदार संदीपान भुमरे यांनी पैठण व औरंगाबाद तालुका, अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड व सोयगाव, रमेश बोरनारे यांनी वैजापूर व गंगापूर, उदयसिंग राजपूत यांनी कन्नड व सोयगाव तालुक्‍याचा तर आंबादास दानवे यांनी गंगापूर, खुलताबाद व फुलंब्री तालुक्‍याचा पाहणी दौरा पूर्ण केला. 

असा असणार दौरा 
ओल्या दुष्काळामुळे दुखी झालेल्या शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्यासाठी व नुकसानीची पाहणी करण्यासाठी श्री. ठाकरे यांनी बालेकिल्ल्यापासून सुरवात केली असून रविवारी ते दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते शिवसेनेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या कन्नड मतदार संघातील कानडगाव येथे सकाळी 11 वाजता आणि दुपारी वैजापूर तालुक्‍यातील गारज येथे दुपारी 12 वाजता परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यानंतर दुपारी 1 वाजता औरंगाबाद येथे सुभेदारी विश्राम गृहात  आढावा बैठक घेतील.

शिंदे आणि मराठवाडा 
जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी शनिवारी (ता. दोन) सर्वांत प्रथम औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा केला. वर्ष 2014 मध्ये श्री. शिंदे जेव्हा विरोधी पक्षनेतेपदी निवडले गेले होते त्यावेळीही त्यांनी विरोधीपक्षनेता निवडीनंतर पहिला दौरा मराठवाड्याचा केला होता. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेतल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udhav thackeray marathwada drought tour