साडेचार हजार शाळांनी केली नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

‘यू-डायस प्लस’ फायदा  
एनआयसीमार्फत यू-डायस प्लस हे पोर्टल विकसित केले असून, या पोर्टलवर सर्व माहिती अपडेट करण्याची जबाबदारी त्या-त्या शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविली आहे. यू-डायस प्लसवर पहिली ते १२ वीपर्यंतची माहिती ऑनलाइन भरण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षातील योजनांच्या समग्र शिक्षा अभियानाचे अंदाजपत्रक केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून जाहीर केले जाणार आहे. चालू शैक्षणिक वर्षातील पटसंख्या व अन्य आकडेवारी गृहीत धरली जाणार असून, या सर्व बाबींवरून त्या-त्या जिल्ह्याला निधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद - केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे यू-डायस प्लस पोर्टलवर शाळांची माहिती भरण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील बहुतांश शाळांनी आद्याप यू-डायस पोर्टलवर नोंदणी केलेली नसल्याने शासनाकडून वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल चार हजार ५०१ शाळांची नोंदणी पूर्ण झाली. दरम्यान, ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही अशा शाळांसाठी आता दहा जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.

वारंवार सूचना देऊनही जिल्ह्यातील तब्बल शंभर शाळांना यू-डायस प्लस प्रणालीवर ऑनलाइन माहिती भरण्याचा विसर पडला होता. या शाळांना माहिती भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. हा तीस पानांचा फॉर्म निकषानुसार भरण्यात येत नसल्याने शासनाकडून वारंवार मुदतवाढ देत अचूक माहिती सादर करण्याचे सूचित करण्यात येत होते. येत्या ३० जूनला शाळांची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य कार्यालयामार्फत केंद्र शासनाकडे सादर करावयाची होती; मात्र अजून राज्यातील बहुतांश शाळांनी माहिती पूर्ण न भरल्यामुळे या पोर्टलवर नोंदणीसाठी दहा जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल चार हजार ५०१ शाळांपैकी शंभर शाळांची नोंदणी अद्याप बाकी होती. त्यापैकी ६३ शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून ३७ शाळांची माहिती भरणे सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग) यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udise plus portal Information 4500 School Register