मोजक्‍याच शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

चालू बाकीदारांची २५ टक्के रक्कम माफ, जुन्या थकबाकीदारांनाच फायदा 

उमरगा - राज्य सरकारने कर्जमाफीची दुटप्पी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. थकबाकीदारांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला गेला; मात्र चालू थकबाकीदारांना कर्जमाफीपासून दूर ठेवल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कर्जमाफीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ दिवसांपूर्वी सहकार विभागाने कर्जाच्या संबंधित शेतकऱ्यांची यादी तयार करण्याची सूचना जिल्हा बॅंक, विकास सेवा संस्थेला दिली होती. त्यानुसार यादीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

कर्जमाफीचे निकष किचकट आहेत, त्यातून मोजक्‍याच शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्‍यता दिसते आहे. तालुक्‍यात दोन हजार ४९१ थकबाकीदार शेतकरी आहेत. ज्यांची थकबाकी दोनपासून पाच ते दहा लाखांपर्यंत असेल त्या थकबाकीदारांना कर्जमाफीच्या दीड लाखाचा लाभ उर्वरित रक्‍कम भरल्यावर मिळणार आहे. त्यामुळे दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या थकबाकीदारांना कर्जमाफीचा अधिक फायदा मिळणार नाही. दरम्यान, दीड लाखापेक्षा कमी कर्ज असलेल्या थकबाकीदारांची संख्या अधिक दिसत नाही.

चालू थकबाकीदारांवर अन्याय का?
गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा; परंतु जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करून चालू बाकीदार झाले आहेत त्यांना मात्र एकूण बाकीच्या पंचवीस टक्‍के रक्‍कम माफीचा निर्णय घेतला गेला तो अन्यायकारक आहे, अशी संतप्त भावना चालू बाकीदारांतून व्यक्‍त होत आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे पंधरा हजार ६९१ चालू बाकीदार आहेत. त्यांना कर्जमाफीचा फारसा दिलासा नाही. सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय झाला आहे. त्याचे निकष किचकट आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकेकडे असलेल्या थकबाकीदाराच्या आकडेवारीतून दीड लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळू शकणाऱ्या सभासदांची संख्या अद्याप निश्‍चित झालेली नाही.

सरकारने थकबाकीदारांना कर्जमाफीचा दिलासा जरूर द्यावा; मात्र ज्या शेतकऱ्यांनी बॅंकेकडे प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करून पुन्हा बाकीदार झाले, त्यांना माफी हवी होती, कुस्तीच्या फडातील विजयी पहिलवानास बक्षीस देण्याऐवजी पराभूत पहिलवानास बक्षीस देण्यासारखा सरकारचा निर्णय आहे. सरकारने चालू बाकीदारांना २५ टक्‍के रक्‍कम माफीचा निर्णय बदलून तो थकबाकीदारप्रमाणे केला पाहिजे अथवा सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेणे शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरेल. 
- गुलाबराव पवार, शेतकरी, नाईचाकूर

Web Title: umaraga marathwada news farmer loan waiver profit