ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतरही ‘झोल’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

कोर्स नसलेल्या महाविद्यालयात अनेकांची प्रवेशासाठी निवड

उमरगा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या पदव्युत्तर शिक्षणाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत बराच गोंधळ निर्माण झाल्याने ऐनवेळी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. दरम्यान, संबंधित विषयाचे पदव्युत्तर कोर्स नसलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केल्याचा प्रकार झाला आहे.

कोर्स नसलेल्या महाविद्यालयात अनेकांची प्रवेशासाठी निवड

उमरगा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या पदव्युत्तर शिक्षणाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत बराच गोंधळ निर्माण झाल्याने ऐनवेळी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. दरम्यान, संबंधित विषयाचे पदव्युत्तर कोर्स नसलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केल्याचा प्रकार झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी २०१७-१८ या चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले होते. तालुक्‍यातील अनेक विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. विद्यापीठाने प्राप्त अर्जानुसार गुणानुक्रमे पात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी ऑनलाईन जाहीर केली आहे. उमरग्यातील रवी चव्हाण या विद्यार्थ्याचा प्रवेश शहरातील आदर्श महाविद्यालयात करण्यात आला आहे; मात्र तेथे एम. कॉम. पदव्युत्तरचा अभ्यासक्रमच नाही. तर समुद्राळच्या किरण कोकाटेचा एम. एस्सी. (रसायनशास्त्र) प्रवेशासाठी गुंजोटीच्या श्रीकृष्ण महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ऑनलाईनने माहिती प्राप्त झाली; परंतु तेथेही हा कोर्स नाही, असा प्रकार दहा ते बारा विद्यार्थ्यांसोबत झाला आहे.

काही विद्यार्थ्यांनी जातीच्या रकान्यात जातीचा स्पष्ट उल्लेख करून त्यांची नावे खुल्या प्रवर्गात दाखल केले असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान संबंधित विद्यार्थी संबंधित महाविद्यालयास प्रवेशासाठी गेल्यानंतर तेथे नकारात्मक माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अनिश्‍चितता झाली आहे, अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत अथवा परत नोंदणी प्रक्रिया करून प्रवेश घेता येतो, असे अधिकृत सूत्राची माहिती आहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना नजीकच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याचा संभ्रम मात्र आहे.

पदव्युत्तर प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना अचूक माहिती नमूद केली. महाविद्यालयाच्या नावाचे आम्ही पर्याय दिले होते; मात्र ज्या महाविद्यालयात कोर्स नाही तेथे प्रवेशाचा संदर्भ दिला आहे. विद्यापीठाने आम्हा विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित करून शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 
- रवी चव्हाण, विद्यार्थी

Web Title: umaraga marathwada news online admission process zole