कठोर परिश्रमांच्या बळावर खुतेजा, आयेशाची भरारी

अविनाश काळे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

उमरगा - शिकण्याची जिद्द अन्‌ कठोर परिश्रम घेतल्यास घरची परिस्थिती जेमतेम असतानाही भरारी घेता येते, याचा आदर्श उमरग्यातील दोन सख्ख्या बहिणींनी घालून दिला आहे. दहावीपर्यंत कुठलीही शिकवणी न लावता शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर या मुलींनी हे यश मिळविले आहे. या दोघी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.

तालुक्‍यातील डिग्गी येथील रहिवासी व नोकरी-व्यवसायानिमित्त उमरग्यात स्थायिक झालेल्या जमादार कुटुंबीयांची घरची परिस्थिती बेताचीच. १९७०-७५ च्या दशकात अलिसाब जमादार डिग्गीचे कोतवाल होते.

प्रभाकरराव डिग्गीकर यांच्या माध्यमातून अलिसाब यांचा मुलगा पाशुमियाँ जमादार यांना उमरगा तहसील कार्यालयात सेवकाची नोकरी मिळाली. त्यांना चार मुलगे. त्यातील अयुब जमादार यांच्या दोन्ही मुली खुतेजा व आयेशा यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण शरणाप्पा मलंग विद्यालयात झाले.

कोणत्याही विषयासाठी शिकवणी न लावता शाळेतून मिळालेल्या ज्ञानार्जनातून स्वतःच्या कुशाग्र बुद्धिमत्तेवर दहावीच्या परीक्षेत खुतेजा हिला ९० टक्के, तर आयेशाला ८९ टक्के गुण मिळाले. मुलींना बाहेरगावी शिकवण्याची जिद्द होती, मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उमरग्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अकरावीत प्रवेश दिला गेला.

सहा महिन्यांपर्यंत त्या या महाविद्यालयात शिकत होत्या. उच्च शिक्षणासाठीचे ध्येय गाठण्याचा निश्‍चय केलेल्या या दोघींना सुदैवाने लातूरच्या रिलायन्स पॅटर्नच्या त्रिपुरा महाविद्यालयात अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाची संधी मिळाली. या प्रवेशाबाबत आई-वडिल संदिग्ध होते, मात्र नातेवाईक, मित्रांच्या सल्ल्याने जमादार कुटुंबीयांनी दोन्ही मुलींना लातूरला ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय दोघींच्या जीवनासाठी टर्निंग पॉइंट ठरला. दोघी बहिणींनी परिस्थितीची जाण ठेवून कठोर परिश्रम घेऊन बारावीत वैद्यकीय नीट परीक्षेत प्रावीण्य मिळवले आणि दोघींचा बदनापूर (जि. जालना) येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित झाला. सध्या खुतेजा व आयेशा वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाविषयी अनास्था असते; मात्र ध्येय गाठण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर नक्कीच यश मिळू शकते, याचा आदर्श या दोन्ही बहिणींनी घालून दिला आहे. हा प्रेरणादायी आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.

Web Title: umaraga news khuteja aayesha success story