
उमरगा शहर व ग्रामीण भागात भूरट्या चोऱ्या, घरफोड्या अधून - मधून होत आहेत
उमरगा (उस्मानाबाद): उमरगा शहरात चोरीच्या घटना वाढत आहेत. मोबाईल व दुचाकी चोरीचा प्रकार तर नित्याचा झाला आहे. बुधवारी (ता.१७) मध्यरात्रीत शहरातील बालाजी नगर येथे, अनोळखी चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केली असून, नेमका किती मुद्देमाल गेला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान उस्मानाबाद येथील ठसे तज्ञ व श्वान पथक गुरुवारी (ता. १८) दुपारी घटनास्थळी दाखल झाले होते. पथकातील श्वानाने बालाजी नगर येथून माग काढत बँक कॉलनील त्या चोरट्यांचे घर गाठले आणि त्याच्यावर धावत जाऊन हाच चोरटा असल्याचे दाखवून दिले.
उमरगा शहर व ग्रामीण भागात भूरट्या चोऱ्या, घरफोड्या अधून - मधून होत आहेत. आठवडी बाजारातून मोबाईल चोरीचे प्रकार अधून - मधून सुरू आहेत. घरफोड्यातून लंपास केलेल्या मौल्यवान वस्तु व रोख रक्कमेचा मुद्देमाल आणि चोरट्यांचा तपास लागत नाही. पोलिसांचा वचक राहिलेला नाही तर गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीची व गुन्हेगारांची उमरगा पोलीस ठाण्यात सतत ये - जा असते. दरम्यान बुधवारी मध्यरात्री बालाजी नगर येथे किरायाच्या घरात रहाणारे पंचायत समितीचे कृषी अधिकारी अविनाश अंबुरे हे परगावी गेल्याची संधी साधून, चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून घरातील साहित्य अस्तावस्त टाकले.
डोळ्यासमोर एकुलत्या एक मुलाने सोडले प्राण, वडिलांनी फोडला हंबरडा
चोरट्यांच्या हाती कांहीच लागले नाही. त्यामुळे चोरट्यांनी याच भागातील तीन घरात चोरीचा प्रयत्न केला मात्र हाती फारसे कांही लागले नाही. चोरीच्या सत्रात चोरट्यांच्या हाती फारसे लागले नसले तरी चोरट्यांचे धाडस पोलिसांना आव्हान देणारे आहे. गुरुवारी उस्मानाबाद येथील ठसे तज्ञ व श्वानपथक आले होते. चोरीच्या घटनास्थळीचे ठसे व नमुने घेतले आहेत.
श्वानाने दाखवले धाडस !
पथकातील श्वानाने बालाजी नगरमधील श्री. अंबुरे यांच्या घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांचा माग काढत राष्ट्रीय महामार्ग ओलांडून बँक कॉलनीत प्रवेश केला. तेथे पाटल्या नामक चोरट्यांच्या घरात जाऊन तो झोपणाऱ्या गादीचा वास घेतला. घराच्या बाजुलाच अॅटोरिक्षामध्ये पाटल्या होता तेथे श्वान धावत गेला आणि चोरटा पोलिसांच्या हवाली केला. पाटल्यासोबत अवकाळी नामक चोरट्याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान श्वानाच्या धाडसाचे कौतूक करत पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी त्याला दोन हजाराचे बक्षिस दिले.
(edited by- pramod sarawale)