किस्सा उमरगा-लोहारा आमदाराच्या सोनसाखळीचा; चोरीला गेली, हरवली आणि सापडलीही

2Sakal_20News_11
2Sakal_20News_11

उमरगा (जि.उस्मानाबाद) : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यात असलेले उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सोनसाखळी चोरीला गेल्याचा प्रकार रविवारी (ता.१८) घडला. माध्यमांनी बातम्याही प्रसिद्ध केल्या. पाच-सहा तासांनी सोनसाखळी मिळाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रकाराची वेगवेगळ्या बाजूंनी चर्चा होते आहे.

कधी सोनसाखळी चोरीला गेल्याचे तर कधी ती रस्त्यात पडल्याची माहिती सांगण्यात येते. पोलिस म्हणतात की, सोनसाखळी सापडल्याने, तक्रार नसल्याने संशयितांना सोडून देण्यात आले. तेरणा नदीकाठच्या गावाजवळच्या पाहणी दौऱ्यात आमदार चौगुले यांना गळ्यात सोनसाखळी नसल्याचे लक्षात आले आणि एकच चर्चा सुरू झाली. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. एका कार्यकर्त्याने संशयिताकडे चौकशी करण्याची गुप्त माहिती दिली. पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ठाण्यात आणले. दरम्यानच्या काळात नेमके काय घडले की, म्हणे सोनसाखळी सापडली. त्यामुळे चौकशीला आणलेल्या लोकांना सोडून देण्यात आले.

या बाबत आमदाराची लेखी तक्रार नसल्याने आणि सोनसाखळी सापडल्याने त्या लोकांना सोडून देण्यात आल्याचे पोलिस सांगताहेत. मात्र या प्रकारात नेमके काय घडले याची अधिकृत माहिती बाहेर सांगितली जात नाही. सोनसाखळी हरवल्याचे सांगण्यात येते. मात्र चोरट्यांनी लांबवल्याचा गवगवा का करण्यात आला. जर चोरट्यांनी खरेच ती वस्तु परत देण्याचे मान्य केले अथवा दिली असेल म्हणून काय या प्रकरणावर पडदा टाकायचा का ? दौऱ्यात आणखी कुणाची चोरी झाली का ? काही जण बोलतेही झाले नाहीत, म्हणून अशा प्रकारावर पांघरून घालायचे का ? असे अनेक तर्क-वितर्कच्या अनुषंगाने सामान्य नागरिक चर्चा करताहेत. दरम्यान या प्रकरणात एका गावाची नाहक चर्चा होऊ नये म्हणून सोनसाखळीचे प्रकरण थांबवण्यात आल्याची चर्चा होत असली तरी त्याच गावातील नागरिकांना या प्रकरणाचा खेदही वाटतो आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com