
उमरगा : सात महिन्यानंतर मिळाला सर्वसामान्यांना दिलासा; सर्व आजारावरील उपचार सुविधांचा लाभ घेण्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक बडे यांचे आवाहन
उमरगा (उस्मानाबाद) : कोरोना संसर्गामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे रुंपातर कोविड सेंटरमध्ये सुरू झाल्यामुळे गेल्या सहा ते सात महिन्यापासून नॉन-कोविड रूग्णांना तपासणी व उपचार सेवा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आणि नॉन-कोविड रूग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग सुरू करण्यात आले आहेत.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर कोविड रुग्णासाठी आरक्षीत केल्याने अस्थीरोग संबंधित रुग्णांना तळमजल्यावरील अपघात विभाग कक्षामध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र १७ नोव्हेंबर २०२० पासून नॉन-कोविड रूग्णांना आरोग्यविषयक सर्व सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. ट्रॉमा केअर सेंटरचे निर्जंतुकीकरण करून अस्थीरोग संबधीत रुग्णासाठी हा विभाग सुसज्य ठेवण्यात आला आहे.
१७ नोव्हेंबर पासून आत्तापर्यंत चार रूग्णांवर हाडाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रूग्णालयातील सी - आर्म मशीन चालू अवस्थेत असून ती अॉपरेट करण्यासाठी दोन अस्थिरोग तज्ञ उपलब्ध आहेत. तसेच हाडासंबंधीत निदानासाठी क्ष- किरण विभागात दोन क्ष किरण तज्ञ उपलब्ध आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
याबरोबरच प्रसुती विभागात एकूण १० महिलांच्या प्रसूती करण्यात आल्या आहेत. प्रसुतिपश्चात नोंदणी व तपासण्या, कान, नाक घसा तपासण्या, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्ञक्रिया, रक्तदाब व मधूमेह, सर्व लसीकरण, प्रयोगशाळा, इ.सी.जी. या सर्व आरोग्यसेवा उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोना संसर्गामुळे कोविड सेंटर करावे लागल्याने नॉन-कोविड रुग्णांची तपासण्या व उपचार पद्धती बंद करण्यात आल्याने अनेकांची अडचण झाली होती. १७ नोव्हेंबरपासून नॉन-कोविड रुग्णांची तपासण्या व उपचार पद्धती सुरू करण्यात आल्या आहेत. विशेषतः अस्थिरोग व प्रसूती विभागातील सेवा सुरू आहेत. कठीण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी रूग्णालय प्रशासन सज्ज आहे. गरजू रुग्णांनी साथरोग विषयक नियमाचे पालन करून आरोग्याविषयक सेवेचा लाभ घ्यावा. - डॉ. अशोक बडे, वैद्यकिय अधिक्षक