नाराज कार्यकर्ते, अपक्षांची नेतेमंडळींकडून मनधरणी 

नाराज कार्यकर्ते, अपक्षांची नेतेमंडळींकडून मनधरणी 

उमरगा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने पक्षांतर्गत नाराज उमेदवार आणि अपक्षांची मनधरणी करण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींना कसरत करावी लागत आहे. 

तालुक्‍यातील नऊ जिल्हा परिषद गट व अठरा पंचायत समिती गणांसाठी 239 अर्ज दाखल होते. छाननीत बारा अर्ज अवैध ठरले, तर अठरा अर्ज पक्षाच्या उमेदवारांचे पर्यायी अर्ज शिल्लक आहेत, त्यामुळे गटासाठी 91, तर गणांसाठी 118 अर्ज वैध ठरविल्याची माहिती सांगण्यात आली. आता पक्षांतर्गत पर्यायी अर्जाचे उमेदवार व अपक्षांना माघार घेण्यासाठी सर्वच पक्षांतील नेतेमंडळींना कसरत करावी लागत आहे. कवठा गटात डॉ. दिलीप गरूड (कॉंग्रेस), शेखर घंटे (शिवसेना), डॉ. संतोष सनातन (भाजप) यांची नावे निश्‍चित झाल्याने आता पक्षाच्या पर्यायी उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. बलसूरमध्ये कॉंग्रेसचे नानाराव भोसले यांना पक्षाचा अधिकृत "एबी' अर्ज असताना तांत्रिक कारणाने त्यांचा अर्ज बाद झाल्याने आता मनोहर सास्तुरे उमेदवार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रा. सुरेश बिराजदार, भाजपचे दिलीपसिंग गौतम, तर शिवसेनेचे गोविंद तळभोगे यांच्यात लढत निश्‍चित आहे. गुंजोटीत शिवसेनेने भाजपचे दत्तू कटकधोंड यांना उमेदवारी देऊन खेळी केली आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार दिग्विजय शिंदे यांना कडवी झुंज द्यावी लागेल, तेथे कॉंग्रेसचे प्रफुल्ल गायकवाड, कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले शिवाजी गायकवाड राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. भारिपचे राम गायकवाड, शिवसेनेचे हरीश डावरे यांचे अर्ज असल्याने ऐनवेळी काय होते हे पाहावे लागेल. तुरोरीत शेवटच्या क्षणी खेळी करीत शिवसेनेने केशव ऊर्फ बाबा पाटील यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे ऍड. अभयराजे चालुक्‍य यांना मोठी व्यूहरचना आखावी लागेल. कॉंग्रेसचे बसवराज कस्तुरे यांच्यासमोर पारंपरिक मतदार टिकविण्याचे आव्हान आहे. 

येणेगूरमध्ये कॉंग्रेसने पंचायत समिती सदस्य महमंद रफी तांबोळी यांना उमेदवारी दिली आहे. बंजारा समाजातील तरुण कार्यकर्त्यांत मोठी स्पर्धा असून, उमेदवारीचा पत्ता कट झाला, नेमकी ही संधी साधून शिवसेनेने धोंडिराम पवार, भाजपाने बाबू राठोड, तर राष्ट्रवादीने पंकज स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. या गटात बंडखोरांना माघार घेण्याचे सर्वच पक्षात आव्हान आहे. दाळिंबमध्ये बालाजी पाटील (राष्ट्रवादी), धनराज हिरमुखे (कॉंग्रेस), श्रीराम राठोड (भाजप), मनोहर जगताप (शिवसेना) उमेदवार आहेत. आलूर गटात कॉंग्रेसने युवा नेतृत्व शरण पाटील यांना उमेदवारी देऊन पहिला विजय मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. नागेश पाटील (शिवसेना), रविशंकर मडिवाळ (भाजप) व आझादबेग मिर्झा (राष्ट्रवादी) यांच्यासह नऊ उमेदवार आहेत. कदेरमध्ये डॉ. शालिनी जिवनगे (कॉंग्रेस), वैशाली गुरव (शिवसेना), जयश्री थिटे (राष्ट्रवादी) व निर्मला घोडके (भाजप) यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, सर्व गट व गणांत पक्षाच्या वतीने अर्ज भरलेल्या व त्यांना "एबी' फॉर्मचा पर्याय असलेल्या उमेदवारांना माघार घ्यावी लागणार आहे. ऐनवेळी अशा उमेदवारांना "अधिकृत' करायचे असल्यास पहिल्या पसंतीच्या उमेदवारास माघार घ्यावी लागेल. 

कुन्हाळीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा खल! 
कुन्हाळी गटात कॉंग्रेसने प्रकाश आष्टे यांना उमेदवारी दिल्याने दगडू मोरे समर्थकांत नाराजीचा सूर आहे. दोन दिवसांपूर्वी तलमोड येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी श्री. मोरे यांना "अपक्ष' म्हणून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे. कॉंग्रेसच्या बंडखोरीवर लक्ष ठेवून शिवसेना, भाजपचे उमेदवारही श्री. मोरे यांच्याशी संपर्क साधत असल्याची चर्चा आहे. श्री. मोरे यांनी कार्यकर्त्यांचा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, असा आग्रह असल्याचे सांगून याबाबत योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. पक्षाने अश्‍लेष मोरे यांनाही डावलले आहे, या गटात शिवसेनेचे किरण गायकवाड, भाजपाचे संताजी चालुक्‍य उमेदवार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com