पाणी नमुने दूषित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

औरंगाबाद - कचऱ्यापाठोपाठ आता दूषित पाण्याचे संकट शहरवासीयांसमोर उभे राहिले आहे. महापालिकेने शहराच्या विविध भागांत घेतलेल्या १३ नमुन्यांपैकी बहुतांश पाण्याचे नमुने दूषित आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागातील नागरिकांना गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ यासारख्या रोगांची लागण होण्याची शक्‍यता बळावली आहे.

शहरात दूषित पाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पदमपुरा, अंबिकानगर भागांत गॅस्ट्रो, डायरियाची नागरिकांना लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी फारोळा जलशुद्धीकरणाची पाहणी केली. तेथील पाण्याचे नमुनेही घेण्यात आले; मात्र तेथे पाणी स्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, शहरातील विविध भागांत पाहणी करून पाण्याचे नमुने घेण्यासाठी शहर अभियंता सखाराम पानझडे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी सिडको एन-पाच आणि एन-सात येथील पाण्याच्या टाकीवरून पाण्याचे नमुने घेण्यात आले.

त्याचप्रमाणे मरीमाता, शहागंज, चिकलठाणा, विशालनगर, सुधाकरनगर, नक्षत्रवाडी येथील एमबीआरजवळूनही पाण्याचे नमुने घेण्यात आले. १३ पाण्याचे नमुने छावणी येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या तेरा नमुन्यांपैकी बहुतांश पाणी नमुने दूषित असल्याचे प्रयोगशाळेत स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अहवालाची लपवाछपवी 
शहरात शुक्रवारी (ता. सहा) पाण्याच्या नमुने घेण्यात आले होते. त्याचा दोन दिवसांत अहवाल येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले होते; मात्र सहा दिवस उलटले तरी पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. चौकशी केली असता, हा अहवाल एका उपअभियंत्याकडे असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: uncleaned water supply garbage gastro diarrhea sickness

टॅग्स