लिहिलेल्या नव्या नोटांवर अघोषित बंदी! 

लिहिलेल्या नव्या नोटांवर अघोषित बंदी! 

औरंगाबाद - नोटबंदीनंतर दररोज नवनवे नियम रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांकडे धाडले जाताहेत. त्यामुळे बॅंक अधिकारी-कर्मचारी, खातेधारक आणि नागरिकांची होरपळ होत आहे. नवनव्या नियमांमुळे नेमके कोणते नियम पाळायचे याबाबत सर्वांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेने कुठल्याही प्रकारचा आदेश काढलेला नसतानादेखील पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांवर लिहिलेले असल्यास त्या न स्वीकारण्याचे धोरण अवलंबले जात आहे. या अघोषित बंदीचा नाहक फटका व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. 

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या नोटा बाजारात जारी झाल्यापासून असंख्य सामाजिक, व्यापारी आणि उद्योग संघटनांनी नोटा स्वच्छ ठेवण्यासाठी नोटांवर न लिहिण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन स्वागतार्हही होते. त्यामुळे नोटांवर लिहिण्याच्या चुकीच्या प्रथेला काही प्रमाणात आळाही बसला. काही जणांनी पेनने लिहिण्याऐवजी पेन्सिलचा वापर करून नोटा चांगल्या राहण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे नोटा खराब होण्याचे प्रमाण कमी होताना दिसतेय. मात्र, रिझर्व्ह बॅंकेने नव्या पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांवर लिहिलेले असल्यास त्या स्वीकारू नये, या आशयाचे कुठल्याही प्रकारचे अधिकृत पत्र अथवा अध्यादेश बॅंकांना जारी केलेला नाही; तरीसुद्धा बॅंकांकडून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांकडून नोटांवर काहीही लिहिलेले असल्यास पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. परिणामी ग्राहक-व्यापाऱ्यांत तू-तू-मैं-मैं होत आहे. 

नाव न सांगण्याच्या अटीवर शहरातील एका व्यावसायिकाने सांगितले, की माझ्याकडे गेल्या महिन्यात दोन हजार रुपयांची एक नोट ओळखीच्या ग्राहकाकडून आली होती. त्यावर काही आकडे लिहिलेले होते. या अघोषित बंदीमुळे मी ग्राहकाला कल्पना दिली. त्यानंतर ही नोट आमचे चालू खाते (करंट अकाऊंट) असलेल्या बॅंकेत भरण्यास गेलो असता, बॅंकेने नोट घेण्यास असमर्थता दर्शविली. तब्बल पंधरा दिवस पेट्रोलपंप, हॉटेल आणि बॅंकांत ही नोट देऊ केली. मात्र, ती कोणीही न घेतल्याने दोन हजारांची नोट पुन्हा ग्राहकाला परत करावी लागली. वास्तविक रिझर्व्ह बॅंकेने जर कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नसतील, तर ही बॅंकांची मुजोरी सुरू आहे. नोटांवर न लिहिण्याचे धोरण चांगलेच आहे. त्यासाठी व्यापारी महासंघानेही पुढाकार घेतलेला आहे. मात्र, बॅंकांची ही मुजोरी थांबायला हवी. 

सोशल साइटमधून बंदीचा उगम 
नोटबंदीदरम्यान नोटांवर "सोनम गुप्ता बेवफा है' लिहिण्याचा प्रघात, तसेच सोशल साईटवर ट्रेंड सुरू झाला होता. याच दरम्यान सोशल साईटच्या माध्यमातून अनेक संघटनांनी नोटांवर लिहून चलन खराब न करण्याचे आवाहन केले. त्याशिवाय काही सोशल साइट युजरनी लिहिलेल्या नव्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या. या पोस्ट रिझर्व्ह बॅंकेच्या असल्याचे भासवून बॅंका, व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांनी लिहिलेल्या नोटा बंद केल्या. मात्र, रिझर्व्ह बॅंकेचा यासंदर्भात कुठलाही अध्यादेश नसल्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांवर लिहिलेले असल्यास त्या स्वीकारू नयेत, असा आदेश रिझर्व्ह बॅंकेने काढलेला नाही. त्यामुळे खातेधारकांकडून आलेल्या नोटा बॅंकांनी नाकारणे अत्यंत चुकीचे आहे. त्याशिवाय नोटांवर लिहिणेसुद्धा चुकीचेच आहे. या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेने स्पष्टता आणावी. 
- देविदास तुळजापूरकर, राष्ट्रीय सहसचिव, ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com