उपचाराबरोबरच आता लसीकरणाचे नियोजनही जोरात ; साडेसात हजाराहून अधिकांची नोंद पूर्ण, शितसाखळी यंत्रणा देखील सक्षम

गणेश पांडे 
Tuesday, 29 December 2020

जिल्ह्यातील 394 संस्थामधील जवळपास साडेसात हजाराहून ही अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण दिले जाणार आहे.

परभणी : कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या १० महिन्यांपासून परभणी जिल्हा त्रस्त आहे. परंतु जिल्हा प्रशानाच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर चांगले नियंत्रण मिळविलेले आहे. आता लसीकरणाचे देखील मोठे आव्हान असताना ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमपणे तयार आहे. मंगळवारी (ता.29) पर्यंत जिल्ह्यातील फ्रंन्टलाईनवर काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील 394 संस्थामधील जवळपास साडेसात हजाराहून ही अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण दिले जाणार आहे.

हे ही वाचा : हिंगोलीत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज

परभणी जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोना संसर्गाचा धोका काही अंशी कमी होता. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी वेळीच जिल्हाबंदी केल्याने जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधित रुग्णांचा शिरकाव म्हणावा तितक्या प्रमाणात झालेला नव्हता. असे असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला मात्र सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अगदी पहिला रुग्ण सापडल्यानंतरही ज्या प्रमाणात गोंधळ उडायला पाहिजे होता. तितका उडाला नाही. पहिल्या रुग्णाच्या उपचाराचे आव्हान स्विकारून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने देखील ते यशस्वीपणे पेलले. नंतर मात्र हळूहळू जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत गेली. तब्बल आठ हजाराचा टप्पा ही रुग्ण संख्या पार करत आहे. असे असतानाही जिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही अधिकच आहे. यावरून प्रशासनाच्या नियोजनाचा चांगला परिणाम दिसून येत आहे.

हे ही वाचा : हिंगोलीत राज्य राखीव पोलिस दलातील जवानाची आत्महत्या

394 संस्था व 7545 कर्मचारी

जिल्ह्यात कोरोना संसर्गानंतर करण्यात येणाऱ्या लसीकरणाचे कामही तितक्याच नियोजनबध्द पध्दतीने सुरु आहे. लसीकरण हे ऑनलाईन नोंदणी केल्या शिवाय मिळणार नाही. त्यामुळे सर्वात आधी फ्रन्टलाईनवर काम करणारे आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही लस दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालयात काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांची नोंद घेणे सुरु आहे. जवळपास 7 हजार 545 जणांची यादी तयार झाली आहे. यात ग्रामीण भागातील 113 खासगी रुग्णालय, तालुका ठिकाणचे 165 खासगी रुग्णालये तर परभणी शहरातील 53 खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील 63 सरकारी संस्थामधील कर्मचारी देखील यात समाविष्ठ आहेत.

हे ही वाचा : झाडाप्रमाणेच नव्या पिढीची वाढही नैसर्गिकच हवी

शितसाखळी (कोल्ड स्टोअरेज) यंत्रणा ही सक्षम

जिल्ह्यात कोरोनाविषाणूची लस आल्यानंतर तीचा साठा करण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यातील यंत्रणेसमोर आहे. असे असतानाही महापालिकेच्या आरोग्य विभागासह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालातही शितसाखळीची यंत्रणा सक्षम आहे. जिल्ह्यात नजिकच्या काळात 10 ते 12 लाख डोसचा साठा करूण ठेवण्याची व्यवस्था करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under the proper guidance of the district administration the district health system has got good control over corona infection in Parbhani district