मक्‍याच्या कणसाच्या ढिग रचून कॉंग्रेसचे अनोखे आंदोलन

राजेभाऊ मोगल
Thursday, 7 November 2019

अतिवृष्टी, बॅंकांची दिवाळखोरी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग धंदे, आरोग्य, शिक्षण आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी कॉंग्रेसतर्फे गुरुवारी (ता.सात) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

औरंगाबाद - अतिवृष्टी, बॅंकांची दिवाळखोरी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग धंदे, आरोग्य, शिक्षण आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी कॉंग्रेसतर्फे गुरुवारी (ता.सात) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ओल्या दुष्काळामुळे कोंब फुटलेले मकाचे कणसांचा ढिग रचून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. 

 

परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस लागून राहिल्याने पिकांची नासाडी झाली आहे. दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांचे हे प्रश्‍न तातडीने सोडविण्याऐवजी सत्ता स्थापनेच्या कामात मग्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी कॉंग्रेसने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोंब फुटलेल्या मकाच्या कणसाचा ढिग रचत घोषणाबाजी केली.

 

याबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की राज्यातील नाशिक, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना, अकोला, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या 16 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल 13 लाखाहून अधिक हेक्‍टरवरील पिकांचे सुमारे 8 हजार 790 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्‍त केला. पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असले तरी अधिकारी सुट्यांवर असल्याने या कामी टाळाटाळ होत आहे. तसेच सरकारनेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

 

युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच गरीब, मागास, अल्पसंख्याकांमध्ये सरकारबद्दल प्रचंड असा असंतोष आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तसेच थकीत बील माफ करावे, शेतमालास हमीभाव द्यावा, युवकांच्या नोकऱ्या वाचवाव्यात, पीएमसी बॅंकेच्या गुंतवणुकदारांना नुकसान भरपाई द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

 

या आंदोलनात ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहर जिल्हाध्यक्ष नामेदव पवार, डॉ. कल्याण काळे, भाऊसाहेब जगताप, पवन डोंगरे, मोहसीन अहमद, कैसर शेख, किरण डोणगावकर, मुज्जफर खान पठाण, सरोज मसलगे आदी सहभागी होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique agitation of Congress, with a pile of wheat