एऽऽ मला ओळखत नाहीस का? 

univercity.jpg
univercity.jpg

औरंगाबाद : कधी काळी राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॅडमिंटन हॉलवर सध्या फुकट्यांचे राज्य आहे. विशेष म्हणजे, यात कोणीही खेळाडू नसून शहरातील दिग्गज मंडळी आहेत. येथील कर्मचाऱ्यांनी शुल्काची मागणी केल्यावर "ए, कोण रे तू?... मला ओळखत नाहीस का?' असे अरेरावीचे उत्तर मिळत असल्याने क्रीडा विभागाची आर्थिक घडी विस्कटली आहे. 

कधी काळी शहरात बॅडमिंटन खेळाचे माहेरघर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बॅडमिंटन हॉलवर फुकटे सध्या मजा करीत आहेत. दररोज एक तास, चार जणांसाठी चार हजार रुपये प्रतितास असे मासिक शुल्काचे नियम आहेत. पण हे नियम पायदळी तुडवून शहरातील अनेक फुकटे या हॉलमध्ये बॅडमिंटन खेळण्याची हौस भागवतात. विशेष म्हणजे यात कोणीही विद्यार्थी किंवा बॅडमिंटनचा खेळाडू नसून शहरातील प्रतिष्ठित कापड व्यापारी, बेकरी व्यावसायिक, परिवहन कार्यालयातील अधिकारी आदींचा समावेश आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा सिलसिला सुरू असल्याने हॉलचे लाइट बिल आणि मिळकतीची जमवाजमव करताना विद्यापीठाच्या क्रीडा विभागाची दमछाक होत आहे. 

शुल्कदात्यांच्या आड "फुकटचंद' 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या डॉक्‍टरांच्या ग्रुपचे शुल्क वेळेत आणि पूर्ण भरले जाते. या डॉक्‍टरांसाठी बॅडमिंटन हॉल उघडावा लागतो. याच उघड्या दाराने हे "फुकटचंद' हॉलमध्ये शिरतात आणि त्यांना अटकाव केल्यास अरेरावी करतात. मुळात घरचे भरभक्कम असलेले लोक फुकट खेळत असतील तर महिन्याकाठी येणारे सुमारे सव्वा लाखाचे लाइट बिल कुठून भरायचे, असा सवाल येथील कारभाऱ्यांना पडतो. 


शुल्क न भरणाऱ्या अशा फुकट्यांना पैसे मागितले तर अरेरावी केली जाते. लाइट बिल अवाच्या सव्वा येत असताना शुल्क न भरणे अयोग्य आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे यासाठी खासगी सुरक्षा यंत्रणेची मागणी करण्यात येणार आहे. 
- डॉ. दयानंद कांबळे (संचालक, क्रीडा विभाग, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com