उर्दूचे विद्यार्थी गिरवू लागले मराठी पत्रलेखनाचे धडे!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

औरंगाबाद - एकीकडे मराठी भाषेची गळचेपी होत असल्याची ओरड सुरू आहे तर दुसरीकडे मराठीच्या संवर्धनासाठी काही संस्था, संघटनाही पुढे येत आहेत. असाच एक अनोखा उपक्रम शहरात सुरू झाला आहे. रीड ॲण्ड लीड फाउंडेशनतर्फे उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पोस्टकार्डवर मराठी भाषेत पत्रलेखन स्पर्धा घेण्यात येत आहे. गुरुवारी (ता. दहा) स्पर्धेची सुरवात मोईन उल उलूम हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पोस्टकार्डचे वाटप करून माहिती संचालक यशवंत भंडारे यांच्या हस्ते करण्यात आली. 

प्राथमिक स्वरूपात तीन हजार विद्यार्थ्यांना पोस्टकार्डचे वाटप करण्यात आले. उर्दू माध्यमाच्या शाळांमधील २५ हजार विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्डवर मराठीतून पत्रलेखन करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ‘सुंदर माझे शहर’, ‘महाराष्ट्र माझा’, ‘नवीन वर्षात असे हवे शहर’ ‘मी आणि माझे शहर’ आणि ‘स्वच्छ व सुंदर माझे शहर/ राज्य’ असे पाच विषय देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर दहा ओळींत पत्र लिहावयाचे असून हे पत्र, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, महापौरांना पाठविले जातील.

स्पर्धेप्रसंगी यशवंत भंडारे म्हणाले, की मोबाईलच्या काळात पत्र लिहिण्याची सवय व आवड फारच कमी झाली आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या वापरामुळे पत्र लिहिणे बंद झाले आहे. म्हणून मुलांना पत्रलेखन, पत्रव्यवहार आदींची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने २५ हजार पोस्टकार्ड उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने स्पर्धेच्या माध्यमातून लिहून घेतले जाणार आहेत. ही बाब मराठी भाषा वाढीस लावण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. स्पर्धेत उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रीड ॲण्ड लीड फाउंडेशनतर्फे प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. फाउंडेशनमार्फत यापुढेही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रीड अँड लीड फाउंडेशनच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला आहे, असेही श्री. भंडारे यावेळी म्हणाले. 

मराठी शुद्धलेखन स्पर्धेत विद्यार्थी व शिक्षण संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांनी यावेळी केले. मुख्याध्यापिका यास्मीन फरजाना, संस्थेचे अध्यक्ष मुजतबा महेमूद, सचिव जिया अहेमद आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शहजाद यांनी परिश्रम घेतले. श्री. चिंतामणी यांनी आभार मानले.

Web Title: Urdu Student Marathi Education