गरिबीशी टक्कर देऊन तिला व्हायचंय डॉक्टर....

गणेश पांडे
शनिवार, 8 जून 2019

परभणी : घरात आठरा विश्व दारिद्रय... हक्काच्या नातेवाईकांनीही पाठ फिरविलेली... विटावर विटा रचून उभारलेले घर... अश्या विदारक परिस्थितीतही डॉक्टर होण्याची प्रचंड जिद्द... कुठेतरी घराला घरपण व समाजातील वंचितांना आधार देण्याचीही इच्छा..त्यामुळे गत तीन वर्षापासून एकाग्रतेने अभ्यासाचा ध्यास घेतलेल्या अतिसामान्य कुटूंबातील उर्मिला गुणाजी वाघमारे या युवतीने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून इच्छीत ध्येयाकडे वाटचाल सुरु केली आहे.

परभणी : घरात आठरा विश्व दारिद्रय... हक्काच्या नातेवाईकांनीही पाठ फिरविलेली... विटावर विटा रचून उभारलेले घर... अश्या विदारक परिस्थितीतही डॉक्टर होण्याची प्रचंड जिद्द... कुठेतरी घराला घरपण व समाजातील वंचितांना आधार देण्याचीही इच्छा..त्यामुळे गत तीन वर्षापासून एकाग्रतेने अभ्यासाचा ध्यास घेतलेल्या अतिसामान्य कुटूंबातील उर्मिला गुणाजी वाघमारे या युवतीने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून इच्छीत ध्येयाकडे वाटचाल सुरु केली आहे.

परभणी शहरातील वृंदावन कॉलनी जवळ कॅनॉलवरील झोपटपट्टीत आपल्या आईची आई (आजी) आशाबाई नारायण पाटील, आई गंगासागर व दोन लहान बहिणीसह राहणारी उर्मिला लहानपणापासूनच हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखली जाते. दहावीत देखील तीने या परिस्थितीतही 96 टक्के गुण मिळाले होते हे विशेष. उर्मिलाच्या घरात कुणाही मनुष्य नाही. आजी धुणी-भांडी करून तर आई गंगासागर या अंगणवाडी ताई असून त्यातूनच घराचा उदरनिर्वाह चालतो. घर कसले. एक बांधलेली खोली तर एक विटाची खोली. स्वयंपाकघर बाहेर झोपडीतच व स्वयपांक देखील चुलीवरच. म्हणतात ना चिखलातच कमळ फुलते. उर्मिलाचे देखील तसेच आहे. घरच्या विदारक परिस्थितीतही तीने जिद्द सोडली नाही तर आजीने नातीला व आईने मुलीसाठी खस्ता खात तीला मानसिक आधार व कणखरपणा दिल्याचे दिसून येते. आपल्या कुटूंबाच्या परिस्थितीची जाणीव असलेल्या उर्मिला जिद्दीने लढली. नीटच्या पहिल्या प्रयत्नास तीला कमी गुण मिळाले, वैद्यकीयसाठी तिला प्रवेशही मिळाला असता परंतु खासगी  महाविद्यालयांमध्ये तिला शासकीय महाविद्यालयातीलच शुल्क परवडणारे नव्हते तर खासगीचे काय. म्हणून तीन न खचता पुन्हा वर्षभर अभ्यास केला व नीटच्या परीक्षेत तीने 535 गुण प्राप्त केले. 

सकाळने दिला आधार...
दहावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळाल्यानंतर उर्मिला व तिच्या कुटूंबापुढे पुढील शिक्षणाचा व खर्चाचा प्रश्न निर्माण झाला होता. दैनिक सकाळ ने या कुटूंबापुढील अडचणीची दखल घेऊन येथील शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य रणजीत काकडे यांच्या माध्यमातून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणिस आमदार सतिश चव्हाण व प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांच्याशी संपर्क केला. त्यांनी उर्मिलाला दत्तक घेऊन खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. उर्मिलाचा तेथे प्रवेश निश्चित झाल्यानंतर खासगी शिकवणी व त्याच्या शुल्काचा प्रश्न होता. सकाळने येथील हुलसुरे फाऊंडेशनचे डॉ. मारुती हुलसुरे यांना उर्मिलाच्या गुणवत्तेसह परिस्थिती माहिती दिली. त्यांना तात्काळ उर्मिलास मोफत शिकवण्याचे आश्वासन दिले. त्यास बरोबर अन्य मित्रांना देखील हे सांगितले.

आजही उर्मिलाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रवेश मिळाला तरी तेथील शुल्क भरण्याची देखील तिची परिस्थिती नाही. सद्यस्थितीत हे कुटूंब 
त्यासाठी चिंतेत असल्याचे दिसून येते. 

डॉक्टर होऊन सामान्यांना देणार आधार
घरच्या परिस्थितीमुळे आपणही मोठे व्हावे, घरासाठी, समाजासाठी काही तरी करावे, अशी सुप्त भावना नेहमी मनात निर्माण होत असते. माझ्या हातात फक्त अभ्यास करणे होते, तो मी मन लावून जिद्दीने केला. त्यात मला, माझ्या कुटूंबीयांना अनेकांनी पाठबळ, आधार दिला. वैद्यकीय क्षेत्रात एम.डी. रेडिओलॉजीस्ट होण्याची आपली इच्छा आहे. या सेवेतून समाजाची देखील सेवा करण्याचा मानस आहे.
- उर्मिला वाघमारे, विद्यार्थीनी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urmila wants to become a doctor in bad family conditions