सोशल मीडिया वापरताय? बी ॲलर्ट!

सोशल मीडिया वापरताय? बी ॲलर्ट!

औरंगाबाद - एखादी महिला किंवा विद्यार्थिनीचा फोन वाजतो. पलीकडून बोलणारी अनोळखी व्यक्‍ती जणू काही आपल्याबद्दलची सर्व माहिती असल्यासारखा बोलत-बोलत असभ्य भाषेत एकेरीवर येते. त्यावेळी ती महिला, मुलगी गांगरून जाते. कोणाला सांगावे समजत नाही आणि तसेच फोन कॉल्स पुन्हा-पुन्हा येतात तेव्हा मात्र ती हताश होऊन नैराश्‍यामध्ये जाण्याची वेळ येते. आत्महत्येचे विचारही येतात. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात आलेल्या तंत्रज्ञानामुळे असे प्रकार होतात. त्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत सायबर स्टॉकिंग म्हणतात. त्यामुळे सोशल मीडिया वापरा; मात्र सावधगिरीने, असा सल्ला या क्षेत्रातील जाणकारांनी दिला.

काय आहे  सायबर स्टॉकिंग
विविध सामाजिक समस्यांचा अभ्यास करणाऱ्या रेणुका कड म्हणाल्या, ‘‘सायबर स्टॉकिंग या प्रकारात इंटरनेट सेवेच्या माध्यमातून पीडिताला हानी पोचविली जाते. त्यामध्ये ई-मेलच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करणे, धमकाविणे किवा स्वत:चे म्हणणे पूर्ण करण्यासाठी ई-मेलद्वारे दादागिरी करणे आदी प्रकार घडतात. 

कधी जवळची व्यक्ती बनावट ई-मेल आयडी काढून असे ई-मेल करतात. काही वेळा फोन कॉल्स करणे, पीडिताच्या साधनाचा नाश करणे, पीडिताविरुद्ध त्याच्या वस्तूंवर घाणेरडे संदेश किंवा वाक्‍य लिहिणे असे कृत्य केले जातात; तर काही वेळा पीडित व्यक्तीला शारीरिक हानीसुद्धा पोचविली जाते. या प्रकारामधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, प्रेमभंग झालेले, एकतर्फी प्रेम करणारे, जुने प्रेमसंबंध पुन्हा प्रस्थापित करणारे असू शकतात; तर काही वेळा स्वतःचा अहंकार दुखावला गेल्यामुळे बदला घेण्याच्या भावनेनेही अशी कृती केली जाते. सायबर स्टॉकिंग या प्रकारामध्ये पीडिताची संपूर्ण वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती, कामाच्या ठिकाणची माहिती, फोन नंबर आणि समोरच्या व्यक्तीची दैनंदिनी काय आहे, या सर्वांची माहिती जमा करून दुखापत पोचविली जात असते. काही वेळेला ही वैयक्तिक माहिती, फोटो चोरून इंटरनेटच्या सेक्‍स सर्व्हिस किंवा डेटिंग सर्व्हिसच्या वेबसाइटवरही पोस्ट केली जाऊ शकते आणि स्टॉकर हा पीडित व्यक्तीशी ई-मेलद्वारे संपर्कात राहत असतो. काही वेळेला एकच व्यक्ती विविध नावांचा वापर करून पीडित व्यक्तीच्या संपर्कात राहते.

चारित्र्यहनन करणारा प्रकार मोफिंग
फोटो, सेल्फी सोशल मीडियावर टाकून किती लाईक मिळतात ही उत्सुकता लागलेली आहे. या उत्सुकतेपोटी सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोवरून चेहरा क्रॉप करून तो काढून घेतला जातो आणि तो दुसऱ्या एखाद्या मॉडेलच्या चेहऱ्यावर पेस्ट केला जातो. तो इतका बेमालूमपणे केला जातो, की पाहणाऱ्याला तो खरोखरचा वाटावा इतका. यामुळे संबंधित तरुणी किंवा महिलेची मोठी बदनामी होईल, नाचक्‍की होईल, असा गुन्हेगाराकडून प्रयत्न केला जातो. प्रतिष्ठेला धोका होईल, समाजात बदनामी होईल, समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल असे कृत्य केले जाते याला सायबर क्राईमच्या भाषेत सायबर मोफिंग म्हणतात. 

मग काय करायला पाहिजे
  ज्यावेळी महिला, मुली सोशल मीडिया वापरतात त्यावेळी त्यांचा मित्रपरिवार हा विश्‍वासातला हवा. कोणाचीही फ्रेंड रिक्‍वेस्ट आली तर डोळे झाकून ती ॲक्‍सेप्ट करू नका. 

  हिरो-हिरोईन, मॉडेलचे फोटो टाकून उघडलेल्या फेक अकाउंटची फ्रेंड रिक्‍वेस्ट ॲक्‍सेप्ट करू नका. केवळ फोटोंवर भाळून फ्रेंड रिक्‍वेस्ट ॲक्‍सेप्ट केल्यानंतर गुन्हेगार त्यांना आणि इतरांना ती माहिती टॅग करून काहीही अश्‍लील मेसेज, फोटो टाकतात. यासाठी सोशल मीडिया हाताळताना स्वत: जागरूक राहणे हाच खूप चांगला पर्याय आहे.  

  अनोळखी मेल (स्पॅम मेल) उघडू नका. ई-मेलचा सतत पासवर्ड बदलला पाहिजे. 
  सोशल मीडियावर फोटो टाकताना फेसबुक असो; व्हॉट्‌सॲप असो; त्यावर प्रायव्हसी एक ऑप्शन असते. म्हणजे तुम्ही अपलोड केलेला फोटो कोण पाहू शकतो हा पर्याय असतो. त्यात पब्लिक निवडल्यास कोणीही पाहू शकतो, फ्रेंड्‌स म्हटल्यास फक्‍त तुमच्या फ्रेंड्‌स लिस्टमधील लोकच पाहू शकतात, त्यातही दुसऱ्या पर्यायामध्ये तुमच्या फ्रेंड लिस्टमधीलही कोणी-कोणी पाहायला नको तेदेखील निवडता येते आणि मी असे निवडले तर ते फोटो स्वतःशिवाय इतरांना दिसत नाहीत. निर्णय तुमच्या हातात असून, तो सदसद्विवेकबुद्धीने म्हणजे जागरूक राहून घ्यावा. 

कार्यशाळा, मार्गदर्शनाची गरज 
डॉ. संजय शिंदे (सायबर क्राईम विषयाचे संशोधक) :
महिलांसाठी सायबर गुन्हे कसे घडतात. सोशल मीडिया हाताळताना कोणत्या आणि कशा प्रकारे खबरदारी घेतली गेली पाहिजे, याविषयीच्या कार्यशाळा, मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले पाहिजेत. सायबर स्टॉकिंग असो किंवा मोफिंग असो. अशा प्रकारचा कोणताही गुन्हा एखाद्या महिलेच्या, मुलीच्या बाबतीत घडला तर सर्वांत आधी घरच्यांना विश्‍वासात घेऊन तत्काळ पोलिसांत गुन्हा नोंदविला पाहिजे. गुन्हा दाखल केल्यास समोरच्या गुन्हेगाराची हिंमत वाढणार नाही. जर असे केले नाही तर जसे- ‘मऊ लागले की कोपराने खणतात’ या म्हणीप्रमाणे मग गुन्हेगाराचा त्रास आणखी वाढू शकतो. 

तत्काळ पोलिसांत तक्रार द्यावी
घनश्‍याम बी. सोनवणे (सहायक पोलिस निरीक्षक) :
ज्यांना आपण ओळखत नाही अशांची फ्रेंड रिक्‍वेस्ट स्वीकारू नये. जरी चुकून उघडली तर त्यात आपली कोणी कॉमन फ्रेंड आहे का, हे पाहावे. ज्यांच्याकडून फ्रेंड रिक्‍वेस्ट आली आहे त्यांचा संपूर्ण बायोडाटा पाहून आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जागूनच ती स्वीकारायची किंवा नाही हे ठरवायला पाहिजे. ऑनलाइन वधू-वर सूचक मंडळात नोंदणी करताना संपूर्ण डाटा ऑनलाइन असतो. सोशल मीडियावरून डेटा चोरणे, फोटोंचा दुरुपयोग करणे असे प्रकार सायबर गुन्हेगारांकडून केले जातात. फॉरेनहून येणाऱ्या रिक्‍वेस्ट कधीच स्वीकारायच्या नाहीत. सोशल मीडियावरून शक्‍यतो आपली जास्तीची वैयक्तिक माहिती देणे टाळावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे माध्यम वापरताना स्वत: जागरूक असले पाहिजे. कॉमनसेन्स वापरला पाहिजे. एखाद्यावर सायबर स्टॉकिंग, मोफिंग, ई-मेल फ्रॉड, चुकीचे मेसेज येण्याचा प्रसंग उद्‌भवलाच तर तत्काळ समोरच्याला ब्लॉक करावे आणि पोलिस खात्याच्या सायबर सेल किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com