वखार महामंडळाची गोदामे हाऊसफुल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

औरंगाबाद - तूर आणि हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाल्याने हमीभावाने खरेदी केलेला माल साठवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदामे "हाऊसफुल' झाली असून, त्यांना गोदामे भाड्याने घ्यावी लागत आहेत. मेअखेरपर्यंत महामंडळाने आणीबाणीची स्थिती ओळखून औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये 15 हजार 200 टन अतिरिक्‍त क्षमतेची जवळपास आठ गोदामे विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर घेतली आहेत. त्यामुळे वखार महामंडळाची साठवणुकीची क्षमता 2 लाख 13 हजार 850 टन इतकी झाली आहे.

तीन जिल्ह्यांत 111 गोदामे
औरंगाबादच्या विभागीय कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड हे तीन जिल्हे येतात. येथे महामंडळाची स्वमालकीची जवळपास 111 गोदामे असून त्यांची क्षमता 1 लाख 98 हजार 650 टन माल साठविण्याची आहे. शिवाय मेअखेरपर्यंत महामंडळाने आणीबाणीची स्थिती ओळखून 15 हजार 200 टन अतिरिक्‍त क्षमतेची जवळपास आठ गोडाऊन विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर घेतली आहेत. तीनही जिल्ह्यांतील 21 केंद्र व एका विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून अपुऱ्या यंत्रणेच्या आधारावर विविध गोदामांमध्ये माल साठवणुकीचे काम ऑनलाइन सुरू आहे. महामंडळाने साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. त्यासाठी सिल्लोड व बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे प्रत्येकी 3600 टन क्षमतेची गोदामे उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

जिल्हानिहाय गोदामे
37 - औरंगाबाद
50 - जालना
24 - बीड
08 - भाडेतत्त्वावरील

Web Title: vakhar mahamandal godown full