औरंगाबादेतील तोडफोडीशी मराठा आंदोलनाचा संबंध नाही: पोलिस आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

वाळूज येथील आंदोलन आणि कंपन्यात झालेल्या तोडफोडबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाचे आंदोलन सामाजिक होते, ते अशा हिंसक घटनेत सहभागी होतील अशी शक्यता कमीच आहे.

औरंगाबाद : वाळूज येथे नऊ ऑगस्टला औद्योगिक वसाहतीत झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नव्हता, अशा बाबी तपासातून समोर येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी (ता. 14) दिली.

वाळूज येथील आंदोलन आणि कंपन्यात झालेल्या तोडफोडबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाचे आंदोलन सामाजिक होते, ते अशा हिंसक घटनेत सहभागी होतील अशी शक्यता कमीच आहे. तोडफोडीचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे होते त्याकडे याच दृष्टीने आम्ही बघत आहोत. खात्री करून सीसीटीव्ही तपासून व सखोल तपास करूनच आम्ही आरोपीना अटक करीत आहोत.

मराठा आरक्षणाबाबत नऊ ऑगस्टला औरंगाबादसह राज्यात आंदोलन झाले. शहरात शांतता असताना वाळूजमध्ये कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. असंख्य कंपन्यांचे यात नुकसान झाले. यानंतर पोलिसांनी धरपकड सुरु केली. आतापर्यंत एकूण 53 जणांना अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाचा तोडफोडीशी संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाळूज येथील औद्योगिक वसाहतीतील सुमारे ७० कंपन्यांमध्ये गुरुवारी जमावाने आलेल्या हल्लेखोरांनी तोडफोड केली. यात २० ते २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर त्यांना कोणत्याही कंपनीत नोकरी दिली जाणार नाही, असा निर्णय उद्योजकांनी आज जाहीर केला होता.

Web Title: vandalised in Waluj MIDC at Aurangabad police commissioner clarifies Maratha Kranti Morcha