वसमत पंचायत समिती इमारतीच्या छताला गळती

पंजाब नवघरे
रविवार, 30 जून 2019

दरम्यान पंचायत समितीच्या इमारतीची अवस्था लक्षात घेता सुमारे एक वर्षापूर्वी नवीन इमारत बांधकामाला मंजूरी दिली आहे. तसेच अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही इमारतीच्या बांधकामाला मुहूर्त लागला नाही. या कामाच्या निविदाही का प्रसिद्ध झाल्या नाही याचे गौडबंगाल कायम आहे.

वसमत ( जि. हिंगोली) : येथील पंचायत समिती इमारतीला गळती लागली असून पावसाचे पाणी गळण्या यासोबतच सकाळी छताचा काही भाग कोसळल्यामुळे अधिकारी-कर्मचारी सोबतच कार्यालयात येणाऱ्या गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

येथील पंचायत समितीची इमारत सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची आहे. या इमारतीच्या भिंतीला तडे गेले असून सध्या पावसाळ्यात इमारतीचे छतही गळत आहे. शनिवारी ( ता. २९ )  इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला आहे. विशेष म्हणजे कर्मचारी कार्यालयात काम करत असताना या छ्ताचा भाग कोसळला. मात्र सुदैवाने कोणीही कर्मचारी जखमी झाले नाही. इमारतीमधील सर्व विभागाला गळती लागली असून महत्त्वाचे दस्तावेज देखील भिजत आहे.

दरम्यान पंचायत समितीच्या इमारतीची अवस्था लक्षात घेता सुमारे एक वर्षापूर्वी नवीन इमारत बांधकामाला मंजूरी दिली आहे. तसेच अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही इमारतीच्या बांधकामाला मुहूर्त लागला नाही. या कामाच्या निविदाही का प्रसिद्ध झाल्या नाही याचे गौडबंगाल कायम आहे. नवीन इमारतीचे काम मंजूर होऊनही सुरुवात झाली नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुन्या इमारतीमध्ये बसूनच काम करावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा मुळे अधिकारी-कर्मचारी सह कार्यालयात येणाऱ्या गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vasmat panchayat bad condition