वासुदेवाचं लोभस ध्यान लोप पावण्याच्या मार्गावर

संदीप लांडगे
रविवार, 6 मे 2018

औरंगाबाद - ‘‘वासुदेव आला होऽऽ, वासुदेव आलाऽऽऽ, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला होऽऽ, वासुदेव आलाऽऽऽ,’’ हे गाणं ऐकलं की रंगीबेरंगी पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यांसमोर उभं राहतं. वासुदेव म्हणजे अंगभरून पोशाख, हातात टाळ-चिपळ्या, डोक्‍यात विविधरंगी कवड्यांच्या माळांनी गुंफलेला मोरपिसाचा टोप, कपाळी गंध, गळ्यात विविध देवतांच्या माळा, कमरेला बासरी असं हवंहवंसं वाटणारं देखणं रूप. ऐटदार पेहरावातील या वासुदेवाला पहाटेच्या प्रहरी गाणं म्हणत, दान मागत फिरताना पाहणं हा मन प्रसन्न करणारा अनुभव असतो. 

पूर्वी गावात आलेल्या वासुदेवाला मानमरातब मिळायचा. लोक हातातलं काम सोडून घटकाभर थबकायचे. त्याला दाद द्यायचे. वासुदेवाला दान देताना घरच्या लक्ष्मीचा हात कधी आखडत नसे. गावातून तृप्त होऊन वासुदेव परतायचा. काळानुरूप होत गेलेल्या बदलांमुळे वासुदेव हळूहळू लुप्त होत चालला आहे.

शहरे, निमशहरांमधील वसाहती, सोसायटींमधील कप्पेबंद वातावरणामुळे वासुदेवाला या ठिकाणी प्रवेशच मिळत नाही.

घराचे बंद दरवाजे आणि लोकांचे उशिरा उठणे वासुदेवाला अगतिक बनवते. दान मिळणे तर दूरच; पण ही लोककला पाहायला, ऐकायला कोणी नाही, हे वासुदेवासाठी वेदनादायी आहे.

पिढीजात वारसा
वासुदेवाच्या भावी पिढीला पहाटे उठून अंगपोशाख चढवून गाणे म्हणणे मान्य नसल्याने ही मुले वासुदेव न होता शिक्षण घेऊन व्यवसाय अथवा नोकरी करणे पसंत करीत आहेत. खासगाव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील दीडशे-दोनशे घरांत परंपरागत वासुदेवाचा वारसा पिढीजात सुरू आहे. येथील वासुदेव समाजातील बहुतांश कुटुंबे उदरनिर्वाहासाठी पुणे, नगर, नाशिक अशा ठिकाणी भटकंती करीत आहेत. बदलत्या काळात हा समाज विकासापासून दूर फेकला गेला. केंद्रात ओबीसी, राज्यात एनटी ‘ब’ प्रवर्गात समावेश केल्याने शासकीय योजना या समाजापर्यंत पोचतच नाहीत.

मला दोन मुले, एक मुलगी आहे. गल्लोगल्ली फिरणे मान्य नसल्यामुळे मुले वासुदेवाचा वारसा जपण्यास तयार नाहीत. ते शिक्षण घेत आहेत. आल्पसंख्याकांपेक्षाही वासुदेव समाज अत्यल्प असल्याने सरकारने शैक्षणिक आरक्षण द्यावे. म्हणजे आमच्या मुलांवर भटकंती करीत दान मागण्याची वेळ येणार नाही.  
- देविदास यदमाळ (वासुदेव)

Web Title: vasudev song