'अच्छे दिन' भाजी विक्रेत्याच्या अंगाशी...!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

नारायणकर पोलिस ठाण्यात गेले तेव्हा कारण कसे नोंदवावे, असा पेच पोलिसांसमोर उभा राहिला. सोबत असलेल्या कुटुंबातील दोन सदस्यांनाही मारहाण झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीचे "अच्छे दिन' हेच खरे कारण असल्याची खातरजमा होताच आनंदनगर पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली.

उस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीपासून "अच्छे दिन'चा बोलबाला आहे. सत्ताधारी नेटाने, तर विरोधक त्याचा टिकेसाठी वापर करून घेत आहेत; मात्र हेच वाक्‍य उचलल्यामुळे एका साध्याभोळ्या भाजी विक्रेत्याला चक्क मार खावा लागला. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बटाटे स्वस्त झाले, हे ओरडून सांगताना "अच्छे दिन आले' हे वाक्‍य त्याने जोडले, हीच त्याची चूक...!

येथील पोलिस लाईन परिसरात नेहमीप्रमाणे भाजी विक्रेते शिवाजी नारायणकर आले. स्वस्त झालेले बटाटे ग्राहकांना कळावे म्हणून "अच्छे दिन आले, भाजीला भाव पडले, बटाटे घ्या दहा रुपये किलो' असे ओरडून ते विक्री करीत होते. वेगवेगळ्या पद्धतीने विक्रेते आरोळी ठोकतातच, हे काही नवे नाही, असे गृहीत धरून परिसरातील ग्राहक त्याचा आनंद घेत होते. काशीनाथ देशमुखनामक व्यक्तीला मात्र त्याचा राग आला. त्यांनी नारायणकर यांना अडविले. "कशाचे अच्छे दिन आले ते सांग' असे म्हणत देशमुख यांनी त्यांच्या डोक्‍यात दगडाने मारहाण केली. त्यांनी शिवीगाळही केली.

एवढेच नव्हे, तर देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही आपल्या "खास' भाषेत समाचार घेतला. अचानक झालेल्या या प्रकाराने नारायणकर घाबरले, हतबल झाले. तेवढ्यात तेथे गर्दी वाढली. काही जण मारहाणीचे कारण विचारत होते; मात्र उत्तर काय द्यावे, हे गोंधळलेल्या नारायणकर यांना सुचत नव्हते. इतरांकडून कारण कळत होते. पंतप्रधानांच्या प्रसिद्ध वाक्‍याचा उपयोग केल्यामुळे भाजी विक्रेत्यांना मार खावा लागतो, हे आर्श्‍चयकारक आहे, अशी गर्दीत चर्चा होती.

नारायणकर पोलिस ठाण्यात गेले तेव्हा कारण कसे नोंदवावे, असा पेच पोलिसांसमोर उभा राहिला. सोबत असलेल्या कुटुंबातील दोन सदस्यांनाही मारहाण झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीचे "अच्छे दिन' हेच खरे कारण असल्याची खातरजमा होताच आनंदनगर पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली. काशीनाथ देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ते पोलिसांना सापडलेले नाहीत, तर नारायणकर डोक्‍याला पट्टी बांधून आहेत.

Web Title: vegetable vendor beaten in osmanabad