फिटनेसमध्ये वाहनांची कापाकापी

vehicle
vehicle

औरंगाबाद - वाहनांच्या फिटनेस तपासणीमध्ये (योग्यता प्रमाणपत्र) काटेकोरपणा आला आहे. फिटनेस तपासणीत वाहनांची वाढवलेली उंची, लांबी-रुंदी कापल्याशिवाय आता फिटनेस प्रमाणपत्र न देण्याचे धोरण आरटीओ कार्यालयाने स्वीकारले आहे. 

उच्च न्यायालयाच्या बडग्यानंतर फिटनेस तपासणीतील मनमानीला आळा बसला आहे. फिटनेस प्रमाणपत्र देताना होणाऱ्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. याचिकेच्या वेळोवेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अनेक आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यभर फिटनेस तपासणी व्हिडिओ शूटिंगमध्येच अगदी काटेकोरपणे केली जात आहे. या कामात निष्काळीपणा करणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई होत आहे. आतापर्यंत औरंगाबाद कार्यालयातील पाच जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. म्हणूनच फिटनेस तपासणी काटेकोरपणे केली जात आहे. प्रवासी वाहतूक करणारे आणि मालवाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला प्रत्येक वर्षी फिटनेस तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. अनेक वाहनचालक मूळ वाहनांच्या रचनेत बदल करतात. ट्रकची उंची, लांबी किंवा रुंदी वाढवून सर्रास मालवाहतूक केली जाते. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल्सचालक वाहनांच्या आसनक्षमतेमध्ये बदल करून वरचढ कमाई करून घेत असतात.

अशा वाहनांना विनादिक्कत फिटनेस प्रमाणपत्र दिल्या जात होते. आता मात्र या प्रकाराला आळा बसला असून, करोडी येथील फिटनेस ट्रकवर आलेल्या वाहनांची बारकाईने तपासणी केली जात आहे. लांबी, रुंदी किंवा उंची वाढवलेल्या वाहनांना रिजेक्‍ट करून परत पाठवण्यात येत आहे. वाहनांची उंची अधिक असेल तर नियामापर्यंत वाहन कापण्यात येत आहे. लांबी किंवा रुंदी अधिक असेल तर ती कमी केल्याशिवाय फिटनेस केल्या जात नाही.

...तर वाहन रिजेक्ट
वाहन खरेदीच्या वेळी शोरूमचालकाकडून अनेक ॲक्‍सेसरीज वाहनधारकांच्या माथी मारले जातात. वाहन खरेदीनंतर वाहनाला क्रॅशगार्ड, मडगार्ड, बंपर व अन्य अनेक ॲक्‍सेसरीज बसवले जातात. मात्र, असे अतिरिक्त बसवलेले ॲक्‍सेसरीज असल्यास वाहन रिजेक्‍ट करण्याचे धोरण आरटीओ कार्यालयाने सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com