वाहनांचे ‘भंगार’ कायमच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली असून, छोट्या-मोठ्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी जात आहेत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांमार्फत दंडाचा बडगा उगारण्यात येत असला तरी दुसरीकडे अनेकांनी रस्त्यावर भंगार वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १९८ भंगार वाहने आढळून आली आहेत. अशा वाहनांवर कारवाईच होत नाही. राज्य शासनाने यासंदर्भात आदेश देऊनही महापालिका अद्याप सुस्त आहे. 

वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे रस्त्यावरील बेकायदा पार्किंग, भंगार वाहनांमुळे अडचणीत भर पडत आहे. वाहतुकीच्या अडचणीसोबतच प्रदूषण, शहराचे विद्रुपीकरण अशा वाहनांमुळे होत आहे. त्यामुळे रस्त्यावर वर्षानुवर्षे पडून असलेल्या भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने धोरण ठरवावे, असे आदेश शासनाने दिले होते.

भंगार वाहनांच्या तक्रारी घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून द्यावा, निनावी तक्रारी घ्याव्यात, वाहतूक पोलिसांची मदत घ्यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने शहरात रस्त्यांवर पडून असलेल्या भंगार वाहनांचा शोध घाईगडबडीत घेतला असून, १९८ वाहने आढळून आली आहेत. या वाहनांवर काय कारवाई करायची याचे धोरण अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

फाइल आयुक्तांच्या टेबलवर 
भंगार वाहनांचे सर्वेक्षण केल्यानंतर यासंदर्भातील धोरण ठरविण्यासंदर्भातील फाइल सध्या आयुक्तांच्या टेबलवर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गॅरेजसमोर सर्वाधिक वाहने 
गॅरेजची संख्या हजारोंच्या घरात आहे. या गॅरेजसमोरच अशा प्रकारची भंगार वाहने पडून आहेत. त्यामुळे महापालिकेला रस्त्यांची साफसफाई करतानादेखील अडचणी येत आहेत. यापूर्वी महापालिकेने भंगार गाड्या जप्त केल्या होत्या; मात्र त्यांची विल्हेवाट अद्याप लावण्यात आलेली नाही. 

Web Title: vehicle Scrab